दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : वारकरी शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे हभप मारुतीबोवा गुरव आळंदीकर यांच्या ८१ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ समस्त गुरव परीवार व आळंदीकर ग्रामस्थ यांच्या वतीने दिला जाणारा पहीला “आळंदीभुषण वारकरी” पुरस्कार वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व अध्यापक हभप शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर बाबा यांना जाहीर झाला असून तो पुरस्कार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात डॉ.नारायण महाराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली २२ जून सकाळी ९ वा. वितरित केला जाणार आहे असे संकेत वाघमारे (गुरव) यांनी सांगितले आहे.
वै.हभप मारुतीबोवा गुरव आळंदीकर यांचा ८१वा पुण्यतिथी सोहळा माऊली मंदिरात १९ जून ते २२ जून या कालावधीत संपन्न होत आहे. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांच्या सेवा सकाळ व रात्री होणार आहे.
यावेळी प्रथमच मारुती बोवा गुरव आळंदीकर यांच्या स्मरणार्थ समस्त वाघमारे (गुरव) परीवार व आळंदीकर ग्रामस्थ यांच्या वतीने शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर बाबा यांना पहिला आळंदीभुषण वारकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
मानपत्र, स्मृती चिन्ह, रोख रक्कम, संपूर्ण पोषाख, तुळशीचा हार हे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी आ.दिलीप मोहिते पाटील, महेश लांडगे, प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथजी, डॉ.भावार्थ देखणे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक बी.एस.नरके, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, नगरसेविका रेश्मा भोसले, भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, मंदिर समितीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व आळंदीकर ग्रामस्थ व वारकरी साधक बहुसंख्येने उपस्थित राहणार असल्याचे आयोजक संकेत वाघमारे (गुरव) यांनी सांगितले आहे.