
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
मूल :- आज दिनांक १९ फेब्रवारी २०२५ रोजी मूल-चंद्रपूर मार्गावरील प्रेरणा ऑनलाईन सेवा केंन्द्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटना (मूल) चंद्रपूरचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांचे अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आलेल्या या उत्सवात गजानन नागापूरे माजी प्राचार्य नवभारत कनिष्ठ महाविद्यालय मूल,हे उद्घाटक म्हणून तर सुधीरजी सहारे हे प्रमूख अतिथी,तर डोमाजी बटे मुख्याध्यापक जि.प.चितेगाव हे अतिथी म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्प अर्पण करून दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
आपल्या प्रास्ताविकातून डॉ.आनंदराव कुळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश, स्पष्ट करीत जागृत ग्राहक राजा संघटनेचे कार्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी विशद करताना त्यांच्या कार्यकाळात शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या मुलभूत अधिकारांचे कसे रक्षण केले जात होते हे पटवून देताना आजही सर्वसामान्य माणूस फसवला जात असल्याने ग्राहक जागृतीची आवश्यकता असल्याचे आणि म्हणूनच संघटनेची आणि पर्यायाने प्रत्येकाची जबाबदारी मोठी असल्याचे स्पष्ट केले.
या प्रसंगी बोलतांना मुख्य अतिथी डोमाजी बटे सर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांवर जीजाऊ मातेने आदर्शाचे संस्कार केले आणि त्यांचे व्यक्तीमत्व घडवले,एक आदर्श शासनकर्ता आणि रयतेचा राजा घडविला, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले, जलदुर्ग,नौका तेंव्हाही आणि आजही आपल्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे ओळखले जात होते, जात आहेत.
शिवाजी महाराजांचे कर्तृत्व तेव्हा निजामशाही आदिलशाही कुतुबशाही राजवटीत आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रसिद्ध होते आणि तेच आदर्श शासनकर्ता राजा म्हणून आजही त्याची तुलना केली जाते, हे आदर्श आजच्या युवकांना प्रेरणादायी आहे.
त्यांच्या अमाप कर्तृत्वातील काही मोजक्या कर्तृत्वाचा स्विकार जरी आजच्या पिढीने करायचे ठरवले तरीही एक आदर्श पिढी निर्माण होऊ शकते,मात्र आमच्या शिक्षणपद्धतीत खरे शिवाजी जनतेसमोर ठेवल्याच जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुधीरजी सहारे यांनी छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा एक लेखाजोखा मांडताना आजच्या भरकटलेल्या युवा पिढीला त्यांच्या आदर्श शासनकर्ता राजा कसा असावा.त्याची जबाबदारी आणि कर्तव्य यांची खरी ओळख करून देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आणि खऱ्या गरजूंना मदत करण्यासाठी शालेय जीवनापासून एक आदर्श प्रस्थापित करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.
जागृत ग्राहक राजा या ग्राहक संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ग्राहक, ग्राहकांची फसवणूक व ग्राहक संघटनेचे वाढलेले कार्य यांची माहिती दिली. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने एका आदर्श शासनकर्ता राजाच्या कारकिर्दीत सर्वसामान्य माणूस जसा आनंदाने आपले गुजरान करीत होता तशी स्थिती येईल की नाही याची खात्री नाही.
मात्र ग्राहक म्हणून आपले जे हक्क आहेत त्यांची माहिती सर्वसामान्य माणसाला करुन देण्याची आणि जनजागृतीची आवश्यकता असल्याचे आणि दररोज फसवणूकीचे नवनवीन फंडे शोधून जनतेची दिशाभूल करुन ग्राहक नाडवला जात असल्याने आपली जबाबदारी वाढली आहे.
आजपासून १५मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनापर्यंत हा महिना आम्ही “ग्राहक जनजागृती मास” म्हणून साजरा करीत असून या महिन्यात जनतेच्या दरबारात , विविध ,शाळा, महाविद्यालयांत, विविध संस्था,बचत गट, वेगवेगळ्या गावात, शहरात, ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे व त्याचाच एक भाग म्हणून आपले आदर्श प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून हे कार्य सुरू केले असल्याचे व यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन दीपक देशपांडे यांनी केले.
या शिवजयंती उत्सव प्रसंगी प्रेरणा ऑनलाईन सेतू सुविधा केंद्र संचालक प्रमोद मशाखेत्री यांनी शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत मोफत फार्मर आयडी काढून देत उपस्थित ग्राहकांना प्रमाणपत्रांचे वाटप केले,तर काही ग्राहकांना त्यांच्या बँक- आधारचे सिडींग मोफत चेक करून देत प्रमाणपत्राचे वाटप केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रमेश डांगरे सचिव यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.या शिवजयंती सोहळ्यात , जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटना मूलचे पदाधिकारी ,दीपक देशपांडे अध्यक्ष,रमेश डांगरे सचिव, तुळशीराम बांगरे संघटक, मुक्तेश्वर खोब्रागडे, डॉ.आनंदराव कुळे, प्रमोद मशाखेत्री,संजय चिटमलवार, दिलीप चिताडे, डिबेश मशाखेत्री, किर्ती रामशेट्टीवार, मोतीलाल वाघमारे, नत्थु भुरसे आदी उपस्थित होते. याशिवाय लाभार्थी ग्राहक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.