
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
दिनांक १९ फेब्रुवारी २०२५, पुणे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, बहुजनांचे कैवारी, शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पक्षाच्या वतीने एस.पी.एम.एस, शिवाजीनगर येथील महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांच्या हस्ते यावेळी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत शिववंदन करण्यात आले.
पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, माजी नगरसेवक व जिल्हा प्रभारी महेश जगताप, उत्तर भारतीय आघाडी प्रमुख अनिल त्रिपाठी, प्रभाकर खरात, पी.आर.गायकवाड, प्रवीण वाखाडे, बाळासाहेब हातागडे, परशुराम आरोने, किशोर अडागळे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराजांचे युद्ध धोरण, मुत्सद्देगिरी, गनिमी कावा शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती व बारा बलुतेदार यांना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली.
महाराजांच्या सर्वजनहिताय धोरणाची अंमलबजावणी ही सर्वांची जबाबदारी आहे. राज्य कारभार चालवणाऱ्या राज्यकर्त्यांनी महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेत राज्य करणे गरजेचे आहे, असे मत डॉ.चलवादी यांनी यावेळी व्यक्त केले.
पुणेकरांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महानगरपालिकेत बहुजन समाज पक्षाला संधी दिली, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्येयधोरण तसेच विचारांनूसार पुणे शहरात विकासकार्य हाती घेतली जातील, असे आश्वासन शिवजयंतीनिमित्त डॉ.चलवादी यांनी पुणेकरांना दिले. बसप कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करीत त्यांचे विचार आत्मसात करण्याचा निर्धार व्यक्त केला.