दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्रीक्षेत्र आळंदी येथे श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीसंत लक्ष्मीनाथ महाराज पुण्यतिथी उत्सव संपन्न झाला. परमपूज्य गु.मोहननाथमहाराज पैठणकर यांच्या शुभहस्ते संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरमहाराज समाधी पूजन, श्रीसंत लक्ष्मीनाथ महाराज व श्रीसंत केसरीनाथ महाराज समाधीस विधीवत अभिषेक पूजन करण्यात आले.
श्रीसंत लक्ष्मीनाथ महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांचे पुण्यतिथीचे संकीर्तन झाले. भगवान श्रीआदीनाथांपासून प्रवाहीत झालेली ही नाथ परंपरा अनुक्रमे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज व संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज यांच्यापर्यंत प्रवाहीत झाली. महाराष्ट्रात विशेषत्वाने नाथ परंपरेचे महत्त्व आहे, त्याचे कारण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांना याच नाथ परंपरेचा अनुग्रह झाला पुढे लक्ष्मीनाथ महाराज यांना सुद्धा अनुग्रह व गुरुपरंपरा लाभली.
गेल्या सव्वादोनशेहून अधिक वर्षे या नाथ परंपरेचे प्रबोधनाचे व सेवेचे हे कार्य श्रीसंत विट्ठलनाथ महाराज, श्रीसंत गणेशनाथ महाराज, श्रीसंत गौतमनाथमहाराज व विद्यमान पीठाधीश श्रद्धेय परमपूज्य मोहननाथ महाराज यांचे तीर्थरुप श्रीसंत भानुदासनाथ महाराजांच्या रूपाने अखंड अविरत सुरू राहिले व आज परमपूज्य श्रीगुरुवर्य मोहननाथ महाराजांच्या शुभाशीर्वादाने, पावन सहवासाने या परंपरेच्या सेवा व विस्तारकार्याची मोठी नांदी होत आहे.
या पुण्यतिथी उत्सवाला संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजननाथजी, हभप भावार्थ महाराज देखणे, राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, उदबोध महाराज पैठणकर, तुकाराम मुळीक, आबा महाराज गोडसे, सदाशिव पुरंदरे, संदीप लोहोर, किसनराव लोखंडे, बापूसाहेब डफळ व अनेक मान्यवर, महाराज मंडळी व वारकरी भाविक या कार्यक्रमास उपस्थित होते.