समर्थ महाविद्यालयातील एनसीसी विभागातर्फे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान… — एक विद्यार्थी एक वृक्ष संकल्पना…

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा

             लाखनी स्थानिक समर्थ महाविद्यालय तर्फे अनेक समाज उपयोगी व इतरांना प्रेरक ठरतील अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाविद्यालयातील एनसीसी विभागातर्फे नुकतेच वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

             याकरिता एनसीसी कॅडेट्सला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिगांबर कापसे, कॅप्टन बाळकृष्ण रामटेके यांनी मार्गदर्शन केले वर्तमान युगात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावा लागत आहे.

            यामुळे आपले भविष्यकालीन जीवन सुखी करण्यासाठी दरवर्षी किमान एक वृक्ष प्रत्येकाने लावण्याचा संकल्प केला पाहिजे व त्यानुसार, ‘एक मनुष्य एक वर्ष एक वृक्ष’ या नुसार आपले संपूर्ण आयुष्य जगले पाहिजे त्यामुळे प्रतिव्यक्ती किमान 65 वृक्ष या जमिनीवर लावले जातील त्यामुळे वृक्ष संवर्धनाचे व हिरवी पृथ्वी निर्माण करण्याचे कार्य साध्य होईल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य दिगांबर कापसे यांनी केले.

            तर कॅप्टन बाळकृष्ण रामटेके यांनी एनसीसी चे विद्यार्थी शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून व इतरांना प्रेरणादायी म्हणून कार्य करीत असल्याने त्यांच्या हातून आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण होईल असा आशावाद व्यक्त केला.

            तसेच वृक्षारोपण करण्याच्या अनुषंगाने नागपूर येथील बटालियन प्रमुख कर्नल विशाल मिश्रा ,सुभेदार मेजर सुखवीर सिंग हे परिश्रम घेत आहेत.

          यावेळी महाविद्यालय परिसरात प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याकरिता महाविद्यालयातील एनसीसी युनिट उपस्थित होते. गौरव कमाने, नोबेल घुसे, सुजल नागदेव, रोहिणी निखाडे यांनी परिश्रम घेतले.