रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर,नगर परिषदेअंतर्गत स्वच्छता,बांधकाम तथा विविध विकास कामांतंर्गत अनागोंदी कारभार होत आहे.काँग्रेसचे शहराध्यक्ष अविनाश अगडे यांच्यासह माजी नगरसेवक विनोद ढाकुणकर व पदाधिकाऱ्यांनी डंपीग यॉर्डची पाहणी केली.
पाहणी नंतर स्वच्छतेच्या नावावर अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप चिमूर विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे समन्वयक डॉ.सतिश वारजूकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना मूलभूत सुविधा सुयोग्य पद्धतीने देऊन त्यांच्या अडचणी व समस्या दुर करण्याकरिता अनेकदा तोंडी व लेखी निवेदने देण्यात आली.
मात्र,त्याकडे नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.नाली सफाई व स्वच्छतेच्या नावावर अनागोंदी कारभार सुरू आहे.कामे न करता देयके अदा करण्यात येत आहे.ज्यातून आर्थिक लुट केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
डम्पिंग यार्डची पाहणी केली असता येथे कोणतेही कर्मचारी तथा चौकीदार आढळला नाही.डम्पिंग यार्डचा कारभार रामभरोसे सुरू आहे.यार्डमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
मात्र,त्याचा विसर नगर परिषदेला पडला आहे.घनकचरा गाड्या,कचरापेटी भंगार अवस्थेत पडून आहेत.
स्वच्छतेचे कंत्राट देताना आवश्यक दस्तावज न जोडलेल्या निविदा स्विकारण्यात येऊन कंत्राट देण्यात आले आहे.नगर परिषद क्षेत्रात पसरलेल्या अस्वच्छतेने साथीचे आजार पसरण्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे.
देखभाल दुरुस्ती अभावी मोजक्याच घंटागाड्या कार्यरत आहे डंपीग यार्डमधील घनकचरा व्यवस्थापन ठप्प आहे.स्वच्छतेच्या नावावर सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची प्रशासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,अशी मागणी डॉ.सतीश वारजूकर यांनी पत्रकार परिषदेतुन केली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके,नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तुषार शिंदे,माजी बांधकाम सभापती नितीन कटारे,माजी नगरसेवक विनोद ढाकुणकर,ॲड.अरुण दुधनकर,बाळकृष्ण बोभाटे,विवेक कापसे,पप्पू शेख राकेश साटोणे,पवण बंडे आदी उपस्थित होते.