
बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ग्रामदैवत पिरसाहेब ( उदगीरबाबा) यांचा सालबादप्रमाणे ऊरूस गुरूवार 20 मार्च ते शनिवार 22 मार्च दरम्यान संपन्न होणार आहे.साखर कारखाना संचालक,सरपंच, उपसरपंच,आजी-माजी सरपंच सर्व सदस्य आणि पिरसाहेब यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जय्यत तयारी चालवली आहे.
पिंपरी बुद्रुक पंचक्रोषीतील भाविकांचे ग्रामदैवत पिरसाहेब (उदगीरबाबा) यांचा सालाबादप्रमाणे संदल गुरूवार 20 मार्च रोजी सायंकाळी 9 वाजता मजारवर चढवण्यात येणार आहे. तर शुक्रवार 21 मार्च रोजी मुख्य उरुस भरणार असून पुणे व सोलापूर जिल्ह्यातील भाविकांबरोबर पंचक्रोशीतील भाविक नवस फेडण्यासाठी व दर्शनास मोठी गर्दी करीत असतात. त्याच दिवशी मेवा मिठाई, खेळणी, बांगडी, सौदर्य प्रसाधने, आईस्क्रीम, ज्युस आदि विक्रीच्या मोठ्या दुकानांची गर्दी होत असते.
देवाच्या मानाच्या घोड्यांची मिरवणूक (छबीना) सायंकाळी 7 वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत लेझीम, हलगींच्या निनादात काढण्यात येणार आहे. रात्री 9 वाजता निलेशकुमार आहिरेकर सह रूपाली पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ काळज (नारायणगाव) यांचा प्रसिध्द तमाशा होणार आहे.
शनिवार 22 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता पुणे, सोलापूर जिल्ह्यातील नामांकित मल्लांच्या उपस्थितीत कुस्त्यांचा जंगी मुकाबला संपन्न होणार आहे. त्यानंतर सायंकाळी प्रार्थना करुन ऊरुसाची सांगता करण्यात येणार आहे. पिरसाहेबांच्या दर्गाहच्या सभोवताली भाविकांना प्रदक्षिणा घालण्यापुर्वी हात पाय धुण्यासाठी असलेला हातपंपाची नादुरूस्ती दूर करावी. ज्यामुळे भाविकांची मोठी सोय होणार आहे. तसेच दर्गाह सभोवताली पेव्हर ब्लॉक व पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी भाविक व नागरिकांनी केली आहे.