मृत्यू हे या जगातील अंतिम सत्य आहे,१ हजार १४१ जणावरांचा सन्मानपूर्वक दफनविधी… — जेव्हा जीव जन्माला आला तेव्हा प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे.

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

      हे शाश्वत सत्य प्रत्येकाला माहिती असूनही जणू काही आपण कधीच मरणार नाही अशा अविर्भावात माणूस जगत असतो.परंतु काही जण मात्र या सत्याला सामोरे जाताना दिसतात. 

      माणसाच्या मृत्यू नंतर अंतिम संस्कार सन्मानपूर्वक व्हावा असे सगळ्यांना वाटते.हीच आपल्या संस्कृतीची शिकवण असून ती मुक्या जनावरांसाठी सुद्धा लागू आहे.

         शंकरपूर येथील माई फाऊंडेशनचे अमोल देवगिरकर यांनी आगळेवेगळे समाजकार्य करीत,नागभिड आणि चिमूर तालुक्यात मरण पावलेल्या जनावरांचा आणि इतर प्राण्यांचा सन्मानपूर्वक अंत्यविधी करण्याचे कार्य सुध्दा सुरु केले आहे.

     पाळीव प्राणी जेव्हा जिवंत असतात तेव्हा ते माणसासोबत वावरत असतात.त्यामुळे ते घरातील एखाद्या सदस्यां प्रमाणे असतात.ते मेल्यानंतर त्यांच्यावरही माणसांसारखे अंतिम संस्कार होणे आवश्यक आहे.सन्मानपूर्वक अंत्यविधी होणे हा प्राण्यांचाही हक्क आहे,तो हक्क त्यांना मिळावा यासाठी जनतेने प्राण्याबद्दल माणुसकीचा धर्म पाळावा असे आवाहन अमोल देवगिरकर यांनी केले आहे.

****

सन्मानपुर्वक दफनविधी…

       पाळीव जनावरांचा आणि इतर प्राण्यांचा सन्मानपूर्वक अंत्यविधी करण्याचा उपक्रम मागील चार ते पाच वर्षापासून त्यांनी सुरू केला आहे.

       अमोल देवगिरकर हे शंकरपूर येथे पॅथॉलॉजी सेंटर चालवित असून त्यांनी माई फाऊंडेशनची स्थापना केली आहे.

        रस्त्यावरील अपघातांमध्ये कुत्रे,मांजर, गाई-बैल व ईतर वन्यप्राणी मृत पावत असतात.त्यांचा कोणीच वाली नसल्याने अनेक दिवस त्यांचे शव रस्त्याच्या बाजूला पडून राहते.प्राण्यांच्या मृत्यू नंतर बरेचदा दुर्गंधी सुटली तरी कोणी त्यांना दफन करीत नाही असे चित्र अमोलने अनेकवेळा पाहिले.

       त्यामुळे मुक्या प्राण्यांची विटंबना पाहून तो अस्वस्थ झाला होता.बरेचदा ग्रामपंचायत कर्मचारी मृत जनावरे गावाच्या सीमेवर फेकून निघून जात.यामुळे त्याचे मन गहिवरून आले.

       यामुळेच त्याच्या आगळ्यावेगळ्या समाजकार्याला सुरुवात झाली.इतर कोणाची वाट पाहण्यापेक्षा आपणच आपले कर्तव्य बजावले पाहिजे असा विचार करून निर्णायक पाऊल उचलले.

         माई फाउंडेशनच्या वतीने अमोल देवगिरकर मागील पाच वर्षापासून मरण पावलेल्या प्राण्यांचा सन्मानपूर्वक अंत्यविधी करत असून याकरिता निःशुल्क सेवा करून आतापर्यंत हजारोचा वर ( ११४१) मेलेल्या प्राण्यांचा अंत्यविधी त्यानी केलेला आहे.

       एखाद्या नागरिकांनी गावामध्ये मरण पावलेल्या प्राण्याबद्दल माहिती दिल्यानंतर ते सोबत नेलेल्या व्यक्तीला प्राणी दफन केल्यानंतर स्वतः शंभर रुपये देत असतात.ही सेवा आजही चिमूर व नागभीड तालुक्यातील अहोरात्र सुरू आहे.