
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चंद्रपूर १८ फेब्रुवारी – शहरातील मोकाट,बेवारस,भटके श्वान यांची संख्या नियंत्रित ठेवणे,रेबीज निर्मुलन व मनुष्य – प्राणी संघर्ष टाळणे या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे श्वान लसीकरण व निर्बीजीकरणाची मोहीम सुरु असुन याअंतर्गत 4020 मोकाट श्वानांचे निर्बिजीकरण तज्ञ डॉक्टरांद्वारे करण्यात आले आहे.
मोकाट, भटके श्वान ही अनेक ठिकाणची गंभीर समस्या आहे. गाडीच्या मागे धावणे,चावा घेणे,रात्रीच्या वेळेस अंगावर धाऊन जाणे त्यामुळे अपघात होणे इत्यादी प्रकारचे त्रास या बेवारस कुत्र्यांमुळे होतात. पिसाळलेल्या श्वानांच्या चाव्यामुळं,अनेकांना प्राण गमवावे लागतात किंवा रेबिजपासून वाचण्यासाठी अनेक इंजेक्शन टोचून घ्यावे लागतात. प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा 1960 व ॲनिमल बर्थ कंट्रोल 2001 नुसार श्वानांना मारण्यास बंदी आहे. मात्र मोकाट, भटके श्वान यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाते. यावर नियंत्रण आणण्यासाठी चंद्रपूर मनपाद्वारे सदर मोहीम राबविली जात आहे.
शहरातील मोकाट श्वानांची नसबंदी करण्याची जबाबदारी पेटानिटी अँड ॲनिमल रिहॅबिलिटेटर्स (प्यार ) फाऊंडेशनकडे सोपविण्यात आली आहे. शहरात अंदाजे 8 ते 9 हजार बेवारस श्वान असुन त्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने निर्बीजीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मनपातर्फे आतापर्यंत 4020 श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे.
शहरातील मोकाट श्वानांचे निर्बिजीकरण हे तज्ञ डॉक्टरांद्वारे निःशुल्क करण्यात येत आहे. निर्बिजीकरणाबाबत काही तक्रार असल्यास स्वच्छता विभाग प्रमुख डॉ.अमोल शेळके यांना 7588591331 या मोबाईल क्रमांकावर अथवा मनपा कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.