दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी – षट्तिला एकादशीनिमित्त तिर्थक्षेत्र आळंदीला आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी वाहतूक शाखेने प्रदक्षिणा रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करण्यात आली.
बुधवारी (दि.18) षटतिला एकादशी होती. तीर्थक्षेत्र आळंदी येथे एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधीचे दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. त्यामुळे वाहतुकीची कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांमुळे काही दिवसांपूर्वी शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे यावेळी वाहतूक शाखेने खबरदारी घेऊन योग्य नियोजन केल्याचे दिसून आले. भाविक, ग्रामस्थ यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू नये यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.