हर्षवर्धनभाऊंसह जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित :- खा.सुप्रिया सुळे… — भाऊंबद्दल जनतेमध्ये सहानुभूतीची लाट!.. — बावडा येथील सभेस विक्रमी गर्दी!..  — धैर्यशील मोहिते-पाटील यांचीही फटकेबाजी…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

           भाऊ सांगत होते मी एकटा पडलोय, पण नाही भाऊ तुमची ही बहीण आहे ना ? तुम्ही माझ्याबरोबर थोरले भाऊ म्हणून उभे राहीलात, तुमची लहान बहिणी तुमच्या पाठीशी आहे. तसेच पवार साहेबांचे आशीर्वाद आपले पाठीशी आहेत. त्यामुळे हर्षवर्धनभाऊसह पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन खा.सुप्रिया सुळे यांनी केले.

           बावडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.16) रात्री आयोजित सभेत खा.सुप्रियाताई सुळे बोलत होत्या. बावडा येथील सभेला विक्रमी गर्दी झाली होती.

            सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, बाजार तळावर लावलेला विरोधी पक्षाचा बॅनर मी आता पाहिला आहे. आयुष्यातली पहिली लढाई या बॅनर वरील पक्षाचे नाव व चिन्हा संदर्भात आहे. आयुष्यात मी कोर्टाची पायरी चढली नव्हती, पण यांच्यामुळे मी कोर्टाची पायरी चढले. पण मला आनंद आहे की त्याच्यामुळे मी भांडायला शिकले.

            या बॅनरवर चिन्हाच्या खाली लिहिलेलं पाहिजे की हे चिन्ह न्यायप्रविष्ठ आहे, पण या बॅनरवर मला ते कुठेही लिहिलेलं दिसलं नाही. म्हणून हा कोर्टाचा अपमान आहे. या बॅनर फोटो काढून मी उद्या कोर्टात दाखवणार आहे संविधानाने हा देश चालतो कोणाच्या बापाने नाही. चोरी आज तो पकडी गयी आता कोर्टातच गाठ आहे. तालुक्यात जिथे जिथे असे प्रचाराचे त्यांचे बॅनर आहेत त्यांना मी नोटीसच पाठवणार आहे.

              विकसित-महाराष्ट्र-विकसित-इंदापूर, माझा पांडुरंग सांगतोय की, हर्षवर्धन भाऊंच्या नावासमोरील 4 नंबरच बटन दाबा. निवडणुकीमध्ये जे मला सोडून गेले त्यामुळे माझी मतं वाढली. त्यामुळे हर्षवर्धनभाऊसाठी हा शुभ संकेत आहे, असे प्रतिपादनही खा.सुप्रिया सुळे यांनी केले.

               हर्षवर्धन पाटील भाषणात म्हणाले, जशी ताई तुमच्यावर वेळ आली शरद पवार आणि तुम्हाला सोडून सगळे गेले तशी आज माझ्याकडे वेळ आली आहे. काही लोक आम्ही मोठी केली त्यांना समाजात ओळख दिली त्यांना पद दिली गाड्या बंगले झाले कोणाच्या जीवावर झाले. आज समाजात मला एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहेत.

             ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वयंघोषित अध्यक्ष अजित पवार यांनी निमगाव केतकीतील कार्यक्रमात माझ्यावरती टीका केली. ते म्हणाले आता हर्षवर्धन पाटलांकडे आता फक्त चारच माणसं राहिलेत. एक हर्षवर्धन पाटील, त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा. तसेच वरुन ते खोचक असेही बोलले माझी विनंती आहे की त्यांच्यापैकी कोणाला फोडू नका……एवढं वाईट आहे आम्ही ? म्हणालाय लागले की यांचं सगळं संपलयं.

             पुढारी जरी सोडून गेले तरी सर्व जनता माझे बरोबर आहे. 20 तारखेच्या मतदानातून आणि 23 तारखेच्या निकालातून राज्याला दाखवून द्या की इंदापूर तालुका हा हर्षवर्धन पाटील यांचे कुटुंब आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगताच टाळ्यांचा प्रचंड झाला. पवार साहेबांशी ज्यांनी गद्दारी केली अशा इंदापूरच्या गद्दारांना धडा शिकवायचं काम 20 तारखेला करा, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले.

            इंदापूर तालुक्यात 10 वर्षात कसलाही विकास झाला नाही एकालाही नोकरी मिळाली नाही, पाण्याचा प्रश्न आहे.मी तुमचा मोठा भाऊ म्हणून कायम तुमच्या पाठीशी उभा आहे. पुन्हा एकदा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जनतेचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे, असा विश्वासही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

            खा.धैर्यशील मोहिते पाटील भाषणात म्हणाले, महिलांसाठी राज्यभर एस टी चा प्रवास मोफत, 3 लाखांपर्यंत कर्ज माफ, नियमित फेड करणा-यांना वर्षाला 50 हजार अनुदान देणार अशा घोषणा महाविकास आघाडीने केली आहे. सन 1980 साली महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 14 टक्के होतं, 2024 ला ते 13 टक्के आहे. इतर राज्यांचं उत्पन्न वाढले आहे. फाक्सकाॅन,टाटा एअर बस असे उद्योग बाहेर राज्यात गेले. ग्रीन इंडियाचा प्रकल्प बाहेर गेला, 5 लाख रोजगार बाहेर गेला.

            विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील मंत्री होते तेव्हा शासकीय नोकर भरती निघायची,एक आठवड्याच्या आत नियुक्तीपत्र हातात मिळायचे गेल्या दहा वर्षात किती शासकीय नोकर भरती निघाली ? आज खाजगी कंपनी परीक्षा घेतात तो पेपर फुटतो. राज्य सरकारने जाहीर केले की जिथे जिथे शिक्षक कमी पडत आहे तिथे रिटायर शिक्षक घ्यायचा मग आमच्या तरुण पिढीने काय करायचं ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

             हर्षवर्धन पाटलांनी इंदापूर तालुक्यातील एमआयडीसी आणली 10000 लोकांना प्रत्यक्षात प्रत्यक्ष रोजगार मिळाला शरद पवारांनी सिनारमास आणली तिथेही कामगार काम करतात. इंदापूर तालुक्यात सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध झाला आहे शिक्षण संस्था उभा राहिल्या. ज्यांनी केली दहा वर्ष इंदापूर तालुक्याचे नेतृत्व केलं किती लोकांना रोजगार दिला किती संस्था आणल्या सर्वसामान्याची पोर तिथे कामाला लावली कोणती एखादी शिक्षण संस्था काढली? माळशिरस तालुक्यातील बरेच कॉन्ट्रॅक्टर इंदापूर तालुक्यात काम करतात, असे खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

             यावेळी पक्षाची तालुकाध्यक्ष अँड. तेजसिंह पाटील, अशोकराव घोगरे, अंकिता पाटील ठाकरे, उदयसिंह पाटील, सागरबाबा मिसाळ, मनोज पाटील, अमरसिंह पाटील, प्रफुल्ल चव्हाण, अमीर सय्यद, प्रभाकर खाडे, नाना गवळी आदींची भाषणे झाले. यावेळी राजवर्धन पाटील व मान्यवरांनी आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. सभेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

अनेकांचा पक्षप्रवेश व संघटनांचा पाठिंबा!

           या सभेनंतर वकीलवस्तीसह अनेक गावातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला, या शेकडो युवकांचा हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार केला. रामोशी समाज संघटनेसह अनेक संघटनांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले.

चौकट 

युवकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांची क्रेझ!

             युवकांनी सभास्थळी हर्षवर्धन पाटील यांना सुमारे 200 फूट अंतरावरून खांद्यावर घेऊन आणले. यावेळी सर्व मतदार व स्टेजही उभे राहून हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत करीत होते, यावेळी युवकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. त्यामुळे युवक हे हर्षवर्धन पाटील यांना चक्क स्टेजच्या पायऱ्या चढून थेट स्टेजवरच खांद्यावर घेऊन गेले.

               युवकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्वाविषयी क्रेझ निर्माण झाली असून, जनतेमध्येही हर्षवर्धन पाटील यांचेबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.