दीक्षाभुमी सोहळ्या करिता जिल्हा प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन… — चांदा क्लब वर स्टॉल उभारल्याने गर्दीचे योग्य नियोजन व सुविधा… — मनपा स्वच्छता विभागाचे उत्कृष्ट कार्य…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

             वृत्त संपादिका 

चंद्रपूर १७ ऑक्टोबर – जिल्हा प्रशासन,पोलीस प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त नियोजनाने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. चांदा क्लब वर स्टॉल उभारल्याने गर्दीचे योग्य नियोजन व सुविधा होण्यास त्याचप्रमाणे सोहळ्यादरम्यान व सोहळ्यानंतर मनपा स्वच्छता विभागाने उत्कृष्ट कार्य केल्याने परिसर सातत्याने स्वच्छ राखण्यास मदत मिळाली.     

  

        सोहळ्यादरम्यान दीक्षाभुमी परिसर पुर्णवेळ स्वच्छ राहतील यासाठी मनपा स्वच्छता विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले. १५० स्वच्छता कर्मचारी २ शिफ्ट मध्ये परिसरात पुर्णवेळ कार्यरत होते. प्रत्येक कर्मचाऱ्याला परिसर विभागुन देण्यात आल्याने ठराविक वेळाने परिसर स्वच्छ केला जात होता. जागोजागी असे १०० डस्टबिन उभारण्यात आले होते तसेच हा जमा झालेला कचरा नेण्यास १० मोठे कंटेनर उभे करण्यात आले होते.तसेच रात्रीसाठी ३ ऑटो टिप्परद्वारे कचरा वाहुन नेण्याचे काम सातत्याने करण्यात आल्याने परिसरात कुठेही अस्वच्छता निर्माण होऊ शकली नाही.  

        दीक्षाभुमी सोहळ्यास जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठया संख्येने येत असल्याने वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात वाहतुकीत बदल करण्यात आला होता. अवजड वाहनाकरीता रहदारीचा मार्ग वेगळा, शहरातील दुचाकी व चारचाकी (हलकी) वाहनाकरीता रहदारी व्यवस्था वेगळ्या मार्गाने व दीक्षाभूमी सोळयास येणाऱ्या नागरिकांकरीता वाहन पार्किंग स्थळांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व व्यवस्थेची दिशादर्शक फलक मनपातर्फे लावण्यात आले होते.   

  

         परिसरात येणार जनसागर पाहता नागरिकांचा प्रवेश हा चांदा क्लब मार्गे ठेवण्यात आला होता.कार्यक्रमाच्या २ दिवस आधीच मनपातर्फे अन्नदानाचे व इतर स्टॉल्स हे चांदा क्लब ग्राउंडवरच लावण्यात येणार असल्याची जनजागृती केल्याने सर्व स्टॉल्स हे ग्राउंडच्या आतच लागले त्यामुळे सर्व नागरिकांना शांततेत अन्नदानाचा लाभ घेता आला.

     हायमास्ट लाईट उपलब्ध करून देण्यात आले असल्याने परिसरात अंधूक प्रकाशाचा त्रास जाणविला नाही. दीक्षाभुमी परिसरात तथा चांदा क्लब ग्राऊंडवर पाणी पुरवठा, मोबाईल टॉयलेट, वीज पुरवठा, कार्यक्रमाच्या ठिकाणी वैद्यकीय मदत केंद्र, अग्निशमन वाहने सुद्धा मनपातर्फे उपलब्ध करून देण्यात आली होती.

         संपूर्ण परिसर लाकडी कठड्यांनी विभागून ठेवण्यात आला जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच पोलिस विभागाचे मदत केंद्र आदी सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही.