विवेक रामटेके
बल्लारपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी
कोठारी:-
कोठारी पासून चार किमी. अंतरावर असलेल्या कवडजई येथील रमेश मरस्कोल्हे यांच्या घरच्या मागील बाजूस लावलेल्या जाळीत बारा फूट लांब अजगर अडकला होता.
सद्या पावसाळा सुरू असून पावसाच्या दमट वातावरणात सरपटणारे प्राणी बिळाबाहेर येऊन संचार करीत असतात अशात नागरिकांना त्यापासून धोका उत्पन्न होत विषारी सापाच्या दंशाने अनेकजण दगावत असतात. कवडजईत रमेश मरस्कोल्हे यांच्या राहत्या घराच्या मागे असलेल्या जाळीत बारा फूट लांब अजगर अडकल्याची माहिती कोठारीतील सर्पमित्र रतन वासनिक व दत्तू कुचनकर यांना मिळाली. त्यांनी कवडजईत जाऊन अजगराचे रेस्क्यू करून त्यास ताब्यात घेतले. सदर अजगर १२ फूट लांब व १५ किलो वजनाचा होता. त्यास पकडून कोठारी येथील निसर्गयुक्त जंगलात मुक्त करीत त्यास जीवदान दिले.
सर्पमित्र कोठारी परिसरातील गावात, राहत्या घरात व शेतात निघणाऱ्या विषारी, बिनविषारी यासारख्या अनेक सापांना पकडून जीवदान देण्याचे महत्वपूर्ण काम करीत आहेत. मात्र त्यांना शासनस्तरावरून कुठलीही मदत मिळत नाही. मागील दहा बारा वर्षांपासून आपला जीव धोक्यात घालून सरपटणाऱ्या प्राण्यांना जीवदान देण्याचे कार्य करीत आहेत. त्याची दखल शासनाने घेऊन त्यांना मदत करण्याची मागणी सर्पमित्र रतन वासनिक व दत्तू कुचनकर यांनी केली आहे.