रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या लढ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाने स्वातंत्र्याची ठिणगी पेटली व क्रांतिकारांच्या बळकट मनसुब्याने सर्वप्रथम चिमूर स्वतंत्र झाले. सन 1942 च्या क्रांतीत युवा क्रांतीकाऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या रक्तरंजित क्रांतीचा इतिहास अजरामर असून देशाच्या लोकशाहीवर घाला घालून संविधान नष्ट करू पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून हद्दपार करण्यासाठी क्रांतीभूमीत दुसऱ्यांदा बदलाची क्रांती घडवा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
ते क्रांतीभूमी चिमूर येथे शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी आले असता काँग्रेस कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते.
आज 16 ऑगस्ट रोजी चिमूर क्रांती दिना निमित्त राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तथा चिमूर- गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी चिमूरचे अभ्यंकर मैदान येथील शहीद हुतात्मा स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण करून 1942 च्या क्रांतीमध्ये स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या वीर योद्धांना अभिवादन केले.
याप्रसंगी प्रामुख्याने चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान,माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर,काँग्रेस चिमूर विधानसभा समन्वयक डॉ. सतीश वारजुरकर,ओबीसी प्रदेश संघटक धनराज मुंगले,काँग्रेसचे जिल्हा महासचिव गजानन बुटके,प्राध्यापक राम राऊत,तथा बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यापुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की,राज्यातील या महायुती सरकारने दोन लाख कोटींचा चुकीचा अर्थसंकल्प सादर करून यात त्रिकुटांच्या मिलीभगतीतून तिजोरीची सर्रास लूट केली आहे. विकासाच्या नावावर जनतेच्या पैशाची उधळण करीत राज्याला रसातळाला लावण्याचे पाप हे सरकार करीत आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने यांची जिरविल्याने दोन महिन्यातच यांनी आता लाडकी बहीण योजना हाती घेऊन केवळ मतांच्या राजकारणासाठी लॉलीपॉप दाखविला आहे. एकीकडे देशात महिला अत्याचारांचे प्रमाण प्रचंड वाढले असताना व दुसरीकडे विकास कामांचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदारांची देयके अडवून ठेवून केवळ खुर्ची राखण्यासाठी केविलवाना प्रयत्न अशा थोतांड योजनेतून सुरू केला आहे.
तर देशातील मनुवाद्यांकडून गांधी विरुद्ध आंबेडकर असे चित्र निर्माण केल्या गेले. मात्र धर्मनिरपेक्ष काँग्रेसने संविधानासाठी लढा उभारून त्या काळातही संविधान तयार करण्यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुढाकार घेऊन संविधान निर्मितीची जबाबदारी सोपविली होती.
सध्या देशातील अनुसूचित जाती व जमाती यांच्या आरक्षणावर वर्गीकरणाचे संकट ओढावले असून हा या मनुवादी विचारांच्या सरकारचा आरक्षण संपविण्याचा डाव आहे. व राज्याच्या सरकारने ते लागू करू नये अशी आमची भूमिका असल्याचेही विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
राज्यात व देशात क्रांती घडवायची असेल तर पुन्हा एकदा या चिमूरच्या क्रांती भूमीतून बदलाची क्रांती घडवा व चिमूर विधानसभेवर काँग्रेसचा तिरंगा फडकावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यानंतर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी या पद्धतीने एकजूट होऊन निवडणूक लढवली अगदी त्याचप्रमाणे पूर्ण ताकदिनीशी आगामी निवडणुकांना समोर जावे असे आवाहन खासदार डॉ. नामदेव कीरसान यांनी यावेळी केले.
आयोजित कार्यक्रमाप्रसंगी तालुका काँग्रेस चिमूर नागभीड व परिसरातील बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.