ऋषी सहारे
संपादक
चामोर्शी : मागिल दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून धान रोवणीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या आणि गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार जयश्रीताई जराते यांनी आज चामोर्शी तालुक्यातील फराडा, मोहुर्ली, घारगाव, कळमगाव, सगणापूर, भेंडाळा अशा विविध गावांना भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला आणि शेती, रोवणे आणि विविध समस्यांबाबत विचारपूस केली.
दरम्यान जयश्रीताई जराते यांनी भेंडाळा येथील शेतकरी शंकर सातपुते यांच्या शेतात सुरू असलेल्या रोवण्याला भेट देऊन पाहणी केली व तेथील महिलांशी संवाद साधला. यादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, चामोर्शी तालुक्यात चिचडोह हा मोठा सिंचन प्रकल्प असतांनाही मागील दहा वर्षात सत्ताधारी नेत्यांनी भेंडाळा परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध करून देवू शकले नसून शेतकरी कामगार पक्षानेच यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
उल्लेखनीय कि, चिचडोह बॅरेजचे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी एका नेत्याने सावली तालुक्यात पळविले होते. शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते व जयश्रीताई जराते यांनी सातत्याने पाठपुरावा करून २२०० हेक्टर चे पाणी चामोर्शी तालुक्यातील शेतीसाठी पुन्हा मिळविले. मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधी हे पाणी भेंडाळा परिसरात पोहचविण्यात अपयशी ठरले आहेत. या परिसरातील जनता शेतकरी कामगार पक्षासोबत ठाम पणाने पाठिशी राहिल्यास आपण पाण्याचा प्रश्न नक्कीच सोडवू अशी प्रतिक्रिया यावेळी जयश्रीताई जराते यांनी दिली..