बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
गणेशवाडी तालुका इंदापूर या गावाला विजपुरवठा करणारे रोहित्राची मागील दोन महिन्यांपासून दुरावस्था झाली आहे. वीज पुरवठा करणारी केबल, फ्युज बॉक्स तसेच तारा जिर्ण झाल्या असून सतत पणाने मोठं मोठाले बार होत आहेत. महावितरणकडे मागणी करूनही साहित्य दिले जात नसल्याने विज बंदच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
बावडा सब स्टेशन येथून गणेशवाडी गावाला वीज पुरवठा करण्यात येत आहे. परंतु मागील पन्नास वर्षापूर्वीच्या तारा असल्याने सतत पणाने जीर्ण होऊन तुटत आहेत. अनेकदा तर अपघाताला सामोरे जाण्याची वेळ जनावरे व नागरिकांना आली आहे. तात्पुरती मलमपट्टी करून पुन्हा वीज पुरर्वत केली जात असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.
गणेशवाडी गावाला विजपुरवठा करणारे रोहित्राची अवस्थाही काहीशी अशीच असल्याने नागरिकांच्या पदरी सतत निराशाच पडत आली आहे. रोहित्राचे फ्युज बॉक्स मधिल फ्युज फुटले, तुटले असून केबल जळाल्याने मागील दोन महिन्यांपासून अशी तशीच केबल जोडून विज पुरवठा केला जात आहे. रोहितला जवळ राहणाऱ्या नागरिकांना तर सततच्या बार होणे, आग लागणे, तार तुटणे, केबल पेटणे अशा समस्यांमुळे जिव मुठीत धरून राहण्याची वेळ आली आहे.
गावातील जुन्या जिर्ण झालेल्या तारा तातडीने बदलण्यात याव्यात. तारांच्या व रोहित्राच्या खाली व जवळ उगवलेली झाडे तोडण्यात यावीत. रोहित्राला नविन फ्युज बॉक्स व पुरेशी केबल देण्यात यावी. अन्यथा जनावरे व नागरिकांच्या जिवीतास कोणताही धोका होणार नाही याची हमी संबंधित विभागाने द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.