वैष्णवांचा मेळा घेऊन माऊली वाल्मिकींच्या वाल्हे मुक्कामी…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : श्री क्षेत्र पंढरपूरच्या ओढीने व्याकूळ झालेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णव शनिवारी दुपारी दीड वाजता वाल्मिकींच्या वाल्हे मुक्कामी पालखी तळावर विराजमान झाला. दरम्यान, सोन्याच्या जेजुरीतील मुक्काम सकाळी साडेसहा वाजता आटोपत पालखी सोहळा दौंडज खिंडीत न्याहारीसाठी साडेआठ वाजता विसावला. 

      कांदा -मुळा भाजी,अवघी विठाई माझी’ या ओळींचा प्रत्यय शनिवारी दौंडज खिंडीत आला. परिसरातील भाविकांनी पांडुरंगाच्या श्रद्धेने वारकरी बांधवांची घरातील भाजी-भाकरी-ठेचा कांदा वाटून सेवा केली. असा वेळी वातावरण अतिशय भक्तिमय आणि भावूक असते याचा प्रत्यय आला. पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ अन् पावसाची ओढ दूर होऊन बळीराजाला सुखी समाधानी ठेव, अशीच आर्त भावना या न्याहारीतून व्यक्त झाली. न्याहारी उरकून हा सोहळा दुपारी १२.३० वाजता वाल्हे गावात पोहोचला. ठिकठिकाणी होणारे स्वागत आणि दर्शनासाठी झालेल्या गर्दीत वाट काढीत पालखी तळावर विसावली. 

      या सोहळ्यात जेजुरी पासून माजी शिक्षणमंत्री व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा माजी मंत्री वर्षा गायकवाड सहभागी झाल्या. त्यांनी दिंडीमध्ये सहभाग घेवून भजन, ओव्या गात, फेर धरून फुगड्या खेळून वारीचा आनंद लुटला. आमच्या घरात वारीची परंपरा असून ही वारी आनंदाची, रूढी, परंपरा, संस्कृती जपणारा आहे असे सांगून आळंदी येथे पोलिसांनी वारकरी बांधवांवर केलेलं लाठीचार्जचा त्यांनी निषेध केला. या वारीत भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे सहभागी होऊन अभंग गात वारी केली.

      साताऱ्यात होणार जंगी स्वागत दि.१८ जून रोजी पालखी सोहळा नीरा येथे पोहोचणार असून, पुणे जिल्ह्यातील वास्तव्य संपून सोहळा लोणंद (सातारा) जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. शुक्रवारी पालखीतील माऊलींच्या पादुकांना नीरास्नान घालून पूजा करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात पालखीचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. नुसता उकाडा आणि रणरणते उन आणि पावसाची हुलकावणी यामुळे पायी चालणारे वैष्णव घामाघूम होत आहेत.