ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली : चामोर्शी रोड वरील स्थानिक संविधान सभागृह हे गेल्या 12 वर्षांपासून विविध समजपोयोगी कार्यासाठी तसेच सामाजिक मिटिंग, प्रबोधन कार्यक्रमासाठी पुरोगामी संघटनांना विनामूल्य उपलब्ध होत आहे. धर्मानंद मेश्राम, नूतन मेश्राम व कुटुंबियांचा हा मोठा सामाजिक त्याग आहे. त्याच संविधान सभागृहाच्या वर्धापन दिनानिमित्तज्या संघटना वर्षभर त्या ठिकाणी विनामूल्य कार्यक्रम घेतात त्या संघट्नांच्या व मेश्राम कुटुंबियांच्या वतीने “सध्याचे कृषी व शिक्षण धोरण व सामाजिक जबाबदारी ” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
चर्चासत्राच्या अध्यक्ष स्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे विलास निंबोरकर, प्रमुख वक्ते म्ह्णून सामाजिक अभ्यासक जयकुमार मेश्राम व सोशल एज्युकेशन मूव्हमेन्ट चे जिल्हा संयोजक शाम रामटेके हे होते. यावेळी जयकुमार मेश्राम यांनी वर्तमानातील शिक्षण व्यवस्थेतील आव्हानाना सामोरे जाण्यासाठी सध्याच्या बदलत्या काळातील परिस्थिती, अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प यांचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे यावर मार्गदर्शन केले व सरकारने कृषी व शिक्षण क्षेत्रावर मांडलेला बजेट अत्यंत अल्प असून हे देशाला घातक आहे, याचा विरोध सर्व स्तरातून व्हावा असे आवाहन सुद्धा केले.
कार्यक्रमादरम्यान संविधान सभागृहाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत रोहिदास राऊत, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलास नगराळे, प्रकाश दुधे, काका गडकरी, प्रवृत्ती वाळके यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन राज बन्सोड, प्रास्ताविक धर्मानंद मेश्राम व आभार धम्मराव तानादु यांनी केले. कार्यक्रमाला गडचिरोली, आरमोरी चामोर्शी चे कार्यकर्ते उपस्थित होते.