कापूस उत्पादक शेतकऱ्यांना माल हमीभावाने खरेदी केला जात नाही,हमीभाव खड्ड्यात गेला का? — भावांतर योजनेबाबत मंत्री उत्तर का देत नाही? — विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला संतप्त सवाल…

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये 

मुख्य कार्यकारी संपादक/ विशेष प्रतिनिधी 

मुंबई, दि.१७ – राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळत नाहीये.कापसाची आयात केल्यामुळे बाजारात भाव पडले असल्याची बाब विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या लक्षात आणून दिली.

      विधान सभेत प्रश्नोत्तर काळात कापसाच्या प्रश्नावरून विजय वडेट्टीवार आक्रमक झाले.कापूस उत्पादक शेतकऱ्याचा कापूस आज ६२००- ६३०० रुपयाने खरेदी केला जात आहे.

       सीसीआय कडून खरेदी होत नाही.भावांतर योजने बाबत मंत्री उत्तर देत नाही.राज्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी आत्महत्या करत आहे आणि मंत्री गांभीर्याने या प्रश्नाकडे बघत नाही,ही वास्तविकता अतिशय गंभीर असल्याचे विधिमंडळ नेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी विधानसभा सभागृहात चर्चा दरम्यान सांगितले. 

      तद्वतच ते हमी भावाचा मुद्दा खुलासेवार रेटून धरतांना म्हणाले की,शेतकऱ्यांना हमीभाव देणार सांगत होते,आता हमीभाव खड्ड्यात गेला का? राज्यात २००० हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.मंत्री गोल गोल उत्तर देत आहेत?

     यावर मंत्री जयकुमार रावल यांनी बाजारात जितका कापूस येईल तो कापूस सीसीआय खरेदी करेल.१५ मार्च पर्यंत जे शेतकरी नोंदणी करणार त्याची खरेदी करू असे आश्वासन मंत्री रावल यांनी दिले..

    मात्र शेतकऱ्यांच्या मालाच्या हमीभावाचे काय?हा प्रश्न अनुत्तरित आहे.