भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म..- (पोस्ट नं.१४६…) सदाचार आणि जगाचे अधिकार….

          एक समयी भगवान खारींना जिथे दाणे खायला घालीत त्या राजगृहातील वेणूवनात राहत होते.त्यावेळी स्थविर सारिपुत्त एका मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होते.

•- वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारिपुत्ताला भेटला. औपचारिक अभिवादनाचा प्रकार झाल्यावर सारिपुत्ताने त्याला भगवंतांचे कुशल समाचार विचारले.भिक्खूने भगवंत व भिक्खूसंघ यांचे कुशल सांगितले. त्याप्रमाणेच सारिपुत्ताने विचारल्यावर राजगृह नगरात तंडूलपालदारपालाशी राहणाऱ्या धनंजानी ब्राह्मणाचा कुशल समाचार सांगितला.

       • सारिपुत्ताने त्यांना पुढे विचारले, “ब्राम्हण धनंजानी अप्रमादपूर्वक वागतो का?”

       •भिक्खूने उत्तर दिले, “धनंजानी कसला अप्रमादपूर्वक राहू शकणार? तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांना नागवण्यासाठी आणि ब्राह्मण आणि गृहस्थ याचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी करतो. सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नीही मरण पावली आहे आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे. ती सुशील कुळातली नाही व ती स्वतःही सुशील नाही.”

    •यावर सारिपुत्त बोलले,” धनंजानीची प्रमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे; फार वाईट. एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तो मला भेटेल, त्यावेळी यासंबंधी मी त्याच्याशी बोलेन. “

       • दक्षिण पहाडातील आपला वास पुरा केल्यानंतर सारिपुत्तने आपली चारिका पुढे चालू केली आणि ते राजगृहाला आले. तेथे त्यांनी वेणूवनात वस्ती केली.

     • सकाळी वस्त्र परिधान करून, भिक्षापात्र हातात घेऊन ते राजगृहात भिक्षेसाठी गेले. त्यावेळी ब्राह्मण धनंजानी हा त्याच्या गाईचे दूध ज्या कुरणात काढले जात होते तेथे देखरेख करण्यासाठी गेला होता.

      • भिक्षा संपवून परत आल्यावर सारिपुत्ताने भोजन केले आणि नंतर धनंजानीला गाठले. त्याला येत असलेला पाहून ब्राह्मण त्याला भेटायला पुढे गेला आणि म्हणाला, “भोजनापूर्वी आपण दुग्धपान करू या.”

        • सारिपुत्ताने उत्तर दिले, “नको ब्राह्मणा,माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे. तूच तेथे ये.”

•धनंजानीने ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर ते सारिपुत्ताला भेटावयास केले.

 सारिपुत्ताला अभिवादन करून ते त्यांच्या बाजूला बसले.

( संदर्भ-भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म,लेखक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर,पान नं.२९६.)

              संकलन

        आयु.प्रशांत चव्हाण सर.