दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर विद्यालय ही प्रशाला शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना निरीक्षणाची सवय लागावी, ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक ठिकाणाची माहिती मिळावी यासाठी श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेने सिंहगड, भाटघर धरण, राजगड सहकारी साखर कारखाना, केतकावळे, नारायणपूर या ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. या शैक्षणिक सहलीमध्ये १७४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर व पालकांच्या हस्ते सहलींच्या गाड्यांचे पूजन करून सहलीला प्रारंभ करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत, पोवाडे – गाणे म्हणत सिंहगड किल्ल्यावर सिंहगडाचा इतिहास जाणून घेतला. त्याच बरोबर भारत हा कृषिप्रधान देश असल्याने चार महिने पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवून त्याचा वर्षभर कसा उपयोग केला जातो ते समजून घेण्यासाठी भाटघर धरणातील स्वयंचलीत मोऱ्यांची प्रत्यक्ष माहिती व अनुभव घेत तेथील यंत्रणा व कार्य पद्धती समजून घेतली . राजगड सहकारी साखर कारखाण्यास भेट देऊन साखर निर्मितीची प्रक्रिया जाणून घेत साखर खाण्याचा आनंद लुटला. त्यानंतर केतकावळे येथील प्रति बालाजीचे दर्शन घेतले. नारायणपूर येथील एकमुखी दत्ताच्या दर्शनाने सहलीची सांगता झाली .
सहल प्रमुख म्हणून काळे वर्षा यांनी जबाबदारी पार पाडली. निशा कांबळे, वैशाली शेळके, राहुल चव्हाण या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी दिली.
तसेच श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रांजणगाव महागणपती , निघोज रांजणखळगे, जय मल्हार कृषी पर्यटन चिंचोली या ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. या शैक्षणिक सहलीमध्ये १६८ विद्यार्थी सहभागी झाले होते .
विद्यार्थ्यांनी भारत कृषिप्रधान देश असल्याने ‘ग्रामीण जीवनाची माहिती, शेतीच्या अवजारे, विज्ञान बाग, गडकिल्ल्यांचा इतिहास प्रदर्शन, बैलगाडी व घोडा गाडी यांची सवारी, जादूचे प्रयोग यांची प्रत्यक्ष माहिती व अनुभव घेत तेथील कृषी यंत्रणा व कार्य पद्धती समजून घेतली. नदीच्या प्रवाहामुळे खडकाचे नैसर्गिकरित्या तयार झालेली रांजणखळगे निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. त्यानंतर महागणपतीचे दर्शनाने सहलीची सांगता झाली .
मुख्याध्यापक दीपक मुंगसे, क्रीडा,शिस्त,सहल विभाग प्रमुख श्रीरंग पवार, सहल समिती प्रमुख कारंजकर हेमांगी यांनी सहलीचे नियोजन करण्याची जबाबदारी पार पाडली.