संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ स्मार्ट हॅकेथॉन स्पर्धा २०२४… — शेतकऱ्यांच्या कृषी जीवनात आर्थिक व्यवसायाचे नवचैतन्य निर्माण करणारे संशोधन…  — संशोधन कार्यासाठी प्रा. गजानन भारसाकळे द्वितीय पुरस्काराने सन्मानित…

युवराज डोंगरे /खल्लार 

           उपसंपादक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत विद्यापीठाच्या इन्क्यूबेशन विभागाच्या वतीने आयोजित स्मार्ट हॅकेथॉन २०२४ अमरावती विभागीय स्पर्धा संपन्न झाली . या स्पर्धेमध्ये एकूण १३० प्रकल्पांसाठी अमरावती विभागातून ५०० स्पर्धकांनी भाग घेतला.

          या स्पर्धेसाठी विभागाद्वारे गठीत स्पर्धा मूल्यांकन कमेटीने निवड केलेल्या आठ स्पर्धकांना उत्तेजनार्थ पुरस्कारांनी गौरविण्यात आले. स्पर्धा आयोजन विद्यापीठ इन्क्यूबीशन विभागा द्वारे प्रस्तावित कंपनी निर्माण व स्टार्ट अप फंडासाठी मूल्यांकन समिती द्वारे पहिल्या तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली.

           यामध्ये प्रथम पुरस्कार वेदांत भेंडकर यांना “बोन लिंक ” संशोधनासाठी , द्वितीय पुरस्कार प्रा . गजानन भारसाकळे यांना अग्रीटेक व फूड या शिर्षकाखाली “लाकडा ऐवजी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या एक पर्यावरण पूरक उर्जा स्तोत्र ” या संशोधना करीता तथा तृतीय पुरस्कार अभिषेक मोडक व अर्जुन माहोरे यांना “ड्रोन ॲविक्स ” या संशोधनाकरीता पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष डॉ.मिलिंद बारहाते कुलगुरु संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आले.

          बाभूळगांव – अकोला येथील शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात सिव्हील इंजिनिअरींग विभागात कार्यरत प्रा. गजानन भारसाकळे यांनी दर्यापूर तालुक्यातील माहुली ( धांडे ) परिसरात स्वतः स्थापन केलेल्या गोरक्षण संस्था स्थळावर गाईच्या शेणात गोमूत्र , सहज उपलब्ध दोन नैसर्गिक वनस्पती व इतर दोन घटक वापरून हे संशोधन कार्य केले असून याच विषयांवर त्यांनी केंद्र शासनाच्या मुंबई कार्यालयात पेंटेंट मिळविण्यासाठी नोंदणी केलेली आहे.

          तसेच राजस्थान राज्यातील जे जे टी यु विद्यापीठात ते याच विषयात पी एच डी सुध्दा करीत असून लवकरच त्यांचे द्वारे “लाकडा ऐवजी पर्यावरण पूरक गाईच्या शेणाची गोवरी हा ऊर्जा स्तोत्र पर्याय ” सिद्ध करणारा संशोधन प्रबंध प्रसिद्ध होणार असून कृषी व शेतकरी जीवनात व्यवसायाचे आर्थिक नवचैतन्य निर्माण करणारे हे कार्य ठरणार असल्याचे मत कृषी क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेले आहे.

             हे संशोधन विद्यापिठातील इन्क्यूबेशन सेंटर द्वारे कंपनी गठन व स्टार्ट अप फंडासाठी निवड झाली असल्याने प्रा. भारसाकळे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अकोला येथे महाराष्ट्रातील ख्यातनाम श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज असून महाविद्यालय स्थापनेपासून गेल्या ४१ वर्षात कंपनी गठन व स्टॉर्ट अप फंडासाठी निवड झालेला हा पहिला संशोधन प्रकल्प म्हणून महाविद्यालय इतिहासात नोंद करणारा असल्याने हि बाब या निमित्याने अधोरेखांकीत झाली आहे.

            तसेच विद्यापीठाचे गाडगेबाबा सामाजिक कार्य व पर्यावरण हे दोन्ही प्रतिष्ठेचे पुरस्कार एकत्रित प्राप्त एकमेव व्यक्ती म्हणूनही त्यांची विद्यापीठात नोंद झालेली आहे.या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण मंचावर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलिंद बारहाते यांचेसह विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रविंद्र कडू , कुलसचिव डॉ अविनाश असणारे, माजी प्र – कुलगुरु डॉ.प्रसाद वाडेगावकर तथा इन्क्युबेशन विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर व विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर यांची उपस्थिती होती.

            एकूण दहा विषय वर्गवारीत घेण्यात आलेल्या या संशोधनरूपी नवकल्पना सादरीकरण दरम्यान कुलगुरु महोदयासह सर्व मान्यवरांनी स्पर्धेतील संपूर्ण चमूंच्या स्टॉलवर भेट देऊन , सर्व संशोधक स्पर्धकांशी दिर्घकाळ चर्चा व संवाद साधला हे या स्पर्धा आयोजनातील प्रमुख वैशिष्ट ठरले.

           समाज जीवनाचा सर्वांगीण विकास साधणारे शिक्षण व त्यासाठी लागणारी संशोधन वृत्ती प्रेरणा यासाठी हे स्पर्धा आयोजन अतीशय उपयुक्त ठरत असल्याने आयोजक अभिनंदनास पात्र असल्याचे गौरव उद्गार कुलगुरु महोदयांनी या प्रसंगी काढले.

            कुलसचिव डॉ.अविनाश असनारे यांनी येणाऱ्या काळातील नव शिक्षण व नवसंशोधन या काळाच्या गरजेवर तथा वास्तविकतेवर भाष्य करीत उपस्थित संशोधकांना आपल्या ओजस्वी वकृत्व शैलीने मोलाचे मार्गदर्शन केले.

            समारंभाचे प्रास्ताविक डॉ.स्वाती शेरेकर , कॉल फॉर सीड फंड बाबत माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद यादव तथा संचलन व आभार प्रदर्शन विभाग व्यवस्थापक अमोल हिरुळकर यांनी केले. संपूर्ण दिवसभर सुरु असलेल्या स्पर्धा नियोजनात इन्क्यूबेशन विभागाच्या आयोजन समितीतील सर्वांनी अथक परीश्रम घेतले.