प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
यंदा विदर्भ साहित्य संघाचे शताब्दी वर्ष आहे त्यानिमित्त चंद्रपूरच्या प्रियदर्शनी नाट्यगृहात आयोजित तीन दिवसीय 68 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचा उत्साही प्रारंभ झाला. संमेलनाध्यक्ष डॉ. वि. स. जोग यांनी संमेलनाची सूत्रे स्वीकारली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कार्यक्रमात उद्घाटक म्हणून उपस्थिती होती. इतिहासाचे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि. स. जोग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महापुरुषांचे प्रतिमाभंजन नकोच मात्र काश्मीर फाइल्स प्रतीही नकारात्मकता नसावी अशी भूमिका मांडली. मार्क्सवाद्यांनी घेतलेल्या काही विशिष्ट भूमिकांमुळे या तत्त्वज्ञानाची पीछेहाट झाल्याचे सांगत चलेजाव आंदोलनाचा विरोध, 1962 च्या चिनी आक्रमणाचे त्यांनी केलेलं स्वागत यामुळे मार्क्सवाद माघारल्याचं ते म्हणाले. केवळ प्रश्नार्थक साहित्य अथवा पोथीनिष्ठ सकारात्मक साहित्य अपूर्ण असल्याचे जोग म्हणाले. साहित्यिकाने प्रश्न विचारले पाहिजेत आणि उत्तरही दिली पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. ग्रंथालयीन अनुदान वाढवूच मात्र वाचक वर्गाची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून केले.