युवराज डोंगरे/खल्लार
दिनांक १२ ते १५ डिसेम्बर २०२२ दरम्यान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन राजश्री शाहू महाराज महाविद्यालय, चांदूर रेल्वे येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयाच्या पुरुष संघाने सलग पाच वेळा अजिंक्यपद पटकावले.
विजयी संघाने प्रथम श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती संघावर ३५ – २२, ३५-१५ अश्या सरळ दोन सेटमध्ये एकतर्फी विजय मिळवत विजयाची सुरवात केली, त्यानंतर केशरबाई लाहोटी संघावर ३५-१९, ३५-१२ अश्या सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवत विजयी घोडदौड कायम ठेवली, त्यानंतर विद्याभारती महाविद्यालय, अमरावती संघावर सुद्धा एकतर्फी विजय मिळवत ए झोनच्या फायनल मध्ये दिमाखात प्रवेश केला, त्यानंतर श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती संघावर ३५-२०, ३५-१५ अश्या दोन सेटमध्ये विजय मिळवत झोन ए चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर बी झोन चे विजेते एस. पी. एम. कॉलेज, चिखली संघासोबत अंतिम सामना झाला, त्यामध्ये पहिला सेट ३३-३५ असा थोड्या पॉईंट ने गमावला त्यांनतर मात्र आपल्या खेळाचे उत्तम असे प्रदर्शन दाखवून दोन्ही सेट ३५-३०, ३५-२४ असे जिंकून आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत पाचव्यांदा अजिंक्यपद राखत बॉल बॅडमिंटन खेळात सत्र २०१८-१९ पासून आपले वर्चस्व सिद्ध केले.
विजयी संघामध्ये उज्वल खेकडे (कर्णधार), विशाल गंगोले, संकेत राखोंडे, विशाल आठवले, करण सोनेवाल, इरफान खान, आर्यन पठाण, रुपेश शिंदे, प्रज्वल प्रजापती व विशाल बोबडे यांनी आपल्या उत्कृष्ठ खेळाच्या जोरावर विजय प्राप्त केला.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चॅम्पियानशिप ट्रॉफी देऊन संघास गौरविण्यात आले. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चूभाऊ कडू, संस्थेचे सचिव मा. भैयासाहेब कडू, संस्थचे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय स्वतःची कठोर मेहनत, आईवडील, प्रशिक्षक व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक, प्रा. डॉ. हरीश काळे, श्री अशोक बिजवे, सिनिअर खेळाडू व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले आहे.