संगम सिल्क हाऊस समोर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तत्काळ बुजवा… — अन्यथा चक्काजाम आंदोलन, पिंकु बावणेचा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा…

          पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी देसाईगंज/वडसा

              दखल न्यूज भारत

देसाईगंज :- शहरातुन लगतच्या पाच तालुक्यांना जोडणाऱ्या संगम सिल्क हाउस समोर राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांपासून मोठ मोठे खड्डे पडले आहेत.मात्र पडलेले खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने या मार्गावरून होत असलेली वाहतुक प्रभावित होऊ लागली आहे.

         ही गंभीर बाब लक्षात घेता येत्या दोन दिवसांत खड्डे बुजविण्यात यावेत,अन्यथा विरोधात सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते पिंकु बावणे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातुन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

         शहराच्या बसस्थानका पासुन काहिच अंतरावर असलेल्या देसाईगंज-कुरखेडा या राष्ट्रीय महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.एका बाजुची नाली बुजवून त्यावर अनाधिकृत अतिक्रमण करण्यात आल्याने नालीचा गंदा पाणी रस्त्यावरून वाहत असुन खड्ड्यात साचून राहात असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे अनेकांच्या वाहनांना अपघात होऊन अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

           शहराच्या याच मार्गावरून अलिकडे सुरजागड लोह प्रकल्पातील लोह खनिजाची देसाईगंज-कुरखेडा-कोरची मार्गे तसेच देसाईगंज-अर्जुनी मार्गे छत्तीसगड राज्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येत असल्याने प्रचंड जड वाहतुक वाढली आहे.

          वाहतुकीचा मुख्य मार्ग असल्याने व त्यातही लगतच्या पाचही तालुक्यांना जोडणारा मार्ग असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र पडलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने या मार्गावरून आवागमन करतांना वाहतुकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

           दरम्यान देसाईगंज- गौरनगर-अर्जुनी या देखील राष्ट्रीय महामार्गावर मोठ मोठ खड्डे पडून डांबरीकरण पुरते उखळले आहे.उखळलेल्या गीट्टीवरून वाहतुक करतांना अनेक जड वाहनांचे टायर फुटून गंभीर अपघात झाले आहेत.मात्र देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेले संबंधित विभागाचे अभियंता, कंत्राटदार गाढ झोपेत असल्याने वाहनधारकांना मात्र जीव मुठीत घेऊन आवागमन करणे क्रमप्राप्त ठरत आहे.

           ही गंभीर बाब लक्षात घेता राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे त्वरीत बुजवून उखडलेल्या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी,अन्यथा विरोधात सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय कार्यालय देसाईगंज समोर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा युवा नेता पिंकु बावणे यांनी दिला आहे.याबाबत काय कारवाई केली जाते याकडे शहरवाशियांचे लक्ष लागून आहे.