ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातून आतापर्यत एक लाख आठ हजार 415 महिलांनी अर्ज केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत-जास्त महिलांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले यासोबतच सदर योजना शासनाची महत्वाकांक्षी योजना असून यात अर्ज नोंदविण्यासाठी दिरंगाई वा हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही यंत्रणेला दिला आहे.
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’ साठी सुरु असलेल्या नोंदणीचा आज दुरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील यंत्रणेकडून आढावा घेतला.
यावेळी गडचिरोली येथून जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर, महिला व बालविकासच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी अर्चना इंगोले, बाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी) ज्योती कडू आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
या योजनेच्या नोंदणी अधिक गतिमान करण्याचे सूचना यावेळी देण्यात आल्या. नोंदणी करण्यात येणाऱ्या सर्व मदतकेंद्रावर योजनेच्या अधिकृत माहितीचे फलक लावण्याचे सांगण्यात आले. मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता अंगणवाडी सेविकांबरोबरच ग्राम स्तरावरील अन्य कर्मचाऱ्यांनाही नियुक्त करण्यात येणार आहे. नवीन बदलांसह आज या योजनेसंदर्भातील सुधारित शासननिर्णय आज निर्गमित झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कालपर्यंत 3373 शहरी तर एक लाख पाच हजार 42 अर्ज ग्रामीण भागातून प्राप्त झाले आहेत. यात 14 हजार 98 अर्ज ऑनलाईन तर 94 हजार 317 अर्ज ऑफलाईन असे एकूण 1 लाख 8 हजार 415 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री देने यांनी दिली.
जिल्ह्यांतील सर्व महिलांनी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभासाठी जास्तीत-जास्त संख्येने नोंदणी करावी. अर्ज भरण्यासाठी सुधारित नमुना वापरावा, यासाठी कोणालाही पैसे देण्यात येवून नये, तसेच नोंदणीच्यावेळी आधार कार्डवरील नाव, पत्ता, आधारक्रमांक व बँकखाते आदी माहिती अचूकपणे नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सहायता कक्षाची स्थापना
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’साठी पैशाची मागणी होत असल्यास तक्रार नोंदविण्यासाठी तसेच अडचर्णीचे निराकरण करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाद्वारे जिल्हा स्तरावर सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचा भ्रमणध्वनी क्रमांक 8999368915 व 8698361830 असा आहे. यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज भरण्यासाठी यांना मिळतोय प्रोत्साहन भत्ता
नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अॅप / पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर रु.50/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे.