
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : संत महात्म्यांनी आपले आयुष्य नद्या काठी घालवले असून, महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्रातून वाहणाऱ्या नद्यांची परस्थिती आज बरी नाही, मी मुख्यमंत्री असताना नद्यांच्या पुनर्जीवनासाठी सुरवात केली आहे येवढ्या वर हे शक्य नसून प्रदूषण मुक्त चळवळ आता लोक चळवळ होणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
१६ मार्च रोजी देहूनगरीत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ वा बीज सोहळा साजरा करण्यात येत आहे. या पवित्र सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देहू संस्थानच्या वतीने ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
यावेळी मा.राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, आळंदी देवस्थान विश्वस्त योगी निरंजननाथजी, देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक मोरे, भानुदास मोरे, विशाल मोरे, माऊली पालखी सोहळाप्रमुख डॉ.भावार्थ देखणे, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शहरप्रमुख राहुल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
पालखी सोहळ्यात शिंदे यांनी दिंड्यांना आर्थिक सहाय्य, स्वच्छता मोहिम आणि इतर विविध सुविधा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल त्यांना ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आला आहे.
शिंदे यांनी आषाढीवारी दरम्यान वारकऱ्यांच्या सेवा सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची निर्मल वारी, हरित वारी संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारामध्ये शिंदे यांना वैभवी शाल, वीणा, चिपळ्या, पुष्पहार, संत तुकाराम महाराज मूर्ती, संत गाथा आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापूर्वी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.