दर्यापूरच्या भूमी अभिलेख कार्यालयाविरुध्द वरीष्ठाकडे तक्रार… — जुन्या सात बारा वरुन केलेली मोजणी रद्द करण्याची मागणी… 

युवराज डोंगरे /खल्लार 

          उपसंपादक 

          पिंपळोद येथिल गट नं 154 क्षेत्रफळ 2 हेक्टरची मोजणी करुन निशाणी कायम करण्यासाठी माधव चिंचोले यांनी 20/1/21 ला भूमी अभिलेख कार्यालय दर्यापूर येथे केलेला अर्ज नियमबाह्य असून या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अर्जाचे कागदपत्रे तपासले नसून केवळ जुन्याच सात बारावर मोजणी केली याबाबतची तक्रार भूमी अभिलेख कार्यालय, अमरावती यांच्याकडे डॉ.प्रकाश चिंचोळकर यांनी केली आहे.

          पिंपळोद येथिल गट नं 154 क्षेत्रफळ 7 हेक्टर 22 आर असून यात माधव चिंचोले यांचा वाटा 2 हेक्टर होता. पुढे हा हिस्सा माधव चिंचोले यांनी त्यांच्या दोन मुलांच्या नावाने बक्षीसपत्र करुन केला. तशी नोंद तलाठी कार्यालयात केली सुद्धा मुले शेताचे मालक झाल्यामुळे माधव चिंचोले यांचे नाव सात बारा मधून कमी झाले. आज त्यांच्याकडे कुठलीही शेती नाही.

            असे असतांनाही माधव चिंचोले यांनी दर्यापूर येथिल भूमी अभिलेख कार्यालयात शेतीच्या मोजणीसाठी जुनाच सात बारा लावून अर्ज केला होता. मात्र भूमी अभिलेख कार्यालयाने पूर्ण कागदपत्रे न तपासता 5 जानेवारी 23 ला नियमात न बसणारी मोजणी करुन कामाचा गलथानपणा सिद्ध केला.

           याबाबत डॉ. प्रकाश चिंचोळकर यांनी भूमी अभिलेख कार्यालय दर्यापूर येथे तक्रारी केल्या व दोषीवर कारवाई करावी अशी मागणी केली. परंतु दर्यापूर येथिल कार्यालयाने चिंचोळकर यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही.

            दर्यापूर कार्यालयाच्या विरोधात भुमी अभिलेख जिल्हा कार्यालय, अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून मोजणी करणाऱ्या दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.