
पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
देसाईगंज :- जीवनात कष्टा शिवाय सुखच नाही म्हणून मानवाने कष्टाला घाबरू नये,मनुष्याने वयाच्या चाळीस वर्षा पर्यंत अगदी सुखाने संसार करावा आणि त्या नंतर मात्र हळूहळू संसारातून अलिप्त होण्याचा प्रयत्न करावा,जगा मध्ये सर्व सुख मिळू शकते परंतु आई वडिलांचे सुख मिळणार नाही.
त्यामुळे मुलांनी आपल्या आई वडिलांची नित्य सेवा करावी त्यांच्या सेवे सारखी जगात कोणतीच सेवा नाही. एकवेळा देवाची पूजा केली नाही तरी चालेल पण आई वडिलांची सेवा केली पाहिजे असे कु.ह.भ.प.ज्ञानेशकन्या वैशालीताई इंगळे यांनी आपल्या भागवत प्रवचनातून सांगितले.
श्री.संत गजानन महाराज, शेगाव यांचे प्रगट दिना निमित्त श्री.संत गजानन महाराज मंदिर,माता वार्ड देसाईगंज येथे दिनांक 13 फेब्रुवारी 2025 ते 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
यात अमरावती येथील कु.ह.भ.प.ज्ञानेशकन्या वैशालीताई इंगळे यांचे द्वारे श्रीमद भागवत प्रवचनाचा संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्व शांती,बंधुभाव, समता व जन जागृती च्या दिव्य संदेशाचा श्री.भागवत प्रवचनातून ब्रम्हरसाचा अमूल्य लाभ देसाईगंज शहरातील भाविक मंडळी घेत आहे.समाजातील प्रत्येक व्यक्तीला मुलींपेक्षा मुलांची अपेक्षा जास्त असते परंतु आपण जर पाहीले तर मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाही उलट मुलीच आई वडिलांची सेवा अधिक प्रामाणिक पणे करीत असल्याचे दिसून येते.
आज समाजात वृद्धाश्रमांची संख्या झपाट्याने वाढत आहे परंतु यात शेतकऱ्यां चे आई वडील खूप कमी प्रमाणात असून सुशिक्षित व नोकरी करणाऱ्याची संख्या अधिक आहे ही विचार करण्या सारखी बाब आहे,मनुष्याला नेहमी तीन व्यक्तीचा आशीर्वाद असला पाहिजे एक म्हणजे गुरु, दुसरा वडील आणि तिसरा त्याची आई, कीर्तन,भागवत हे केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यातून मनुष्याच्या जीवना चे सार्थक झाले पाहिजे. मनुष्याला जीवनातुन मुक्ती देणारे शास्त्र म्हणजे भागवत आहे.
त्यामुळे भागवत श्रवणाने जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही,भागवतात अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या आपण निश्चितच शिकल्या पाहिजे असे ही त्यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले.