स्थाई नियोजन व उपाययोजना अपेक्षित…. — मूल शहरातील पूर परस्थितीवर “संक्रांत ” केव्हा येणार?

  विशेष वार्ता

  प्रा.महेश पानसे..

चंद्रपूर/मूल :- 

       संक्रांत संपली की मूल शहरवासीय एका वेगळ्या भितीच्या छायेत वावरतात. गत ४ वर्षापासून अजूनही आटोक्यात न आलेली शहरातील अंगावर शहारे आणणारी पूर सदृष्य परिस्थिती व त्याहीपेक्षा संतापजनक असते ती अजूनही न झालेली दूरगामी उपाययोजना वा नियोजन गत ४ वर्षापासून जनतेला भारी टेंशन देणाऱ्या पूर सदृष्य स्तितीवर संक्रांत आणण्याचे नियोजन आता न.प.प्रशासनाकडून अपेक्षित आहे.

           गत २ वर्षाआधी शहरातील ८०० घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याची शासन दरबारी नोंद आहे.तेव्हा ५,१० हजार देऊन प्रशासनाने या गंभीर समस्येवर मात केल्याचा आव आणला. दरवर्षी पाऊस सुरू झाल्यावरच पायाला भिंगरी बांधून धावपळ करणारे न.प.प्रशासन संक्रांत संपताच कामाला लागले नाही तर यंदाही भर पावसाळ्यात अनेक कुटुंबांवर संक्रांत कोसळणार व नेमकी हिच भिती आता घर करू लागणार आहे.

          २०२२ मध्ये ८०० घरांमध्ये पाणी घुसून शहराला एखाद्या बेटांचे स्वरूप प्राप्त झाले होते.शहरातील अनेक प्रभागातील कुटुंब मोठ्या नुकसानीचे पार हादरले होते.

         याआधी कधिही मूल शहराला एवढी भयावह पूर स्थितीला सामोरे जावे लागले नव्हते.माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी पुढाकार घेत वनविभाग,सा.बा.विभाग, न.प.प्रशासक, मुख्याधिकारी याचेसोबत अनेकदा चर्चा केल्यानंतर शहरात अचानक पाणी येतो कुठून? या मोठ्या पाण्याचा निचरा तलावांमध्ये का होत नाही? किमान यांचा शोध लागला.

        सा.बा.विभागाने मूल शहरातून जो राष्ट्रीय महामार्ग बांधला,उंची मिटरभर वाढविताना मोठ्या तांत्रिक चुका ठेवल्या त्यामुळेच पावसाळ्यात पूरस्थितीची जिवघेणी समस्या आता कायम राहिली हे सिद्ध झाले आहे.

न.प.प्रशासनाने २०२३ व २०२४ मध्ये डोंगरावरून येणारा पाण्याचा मोठा लोंढा मोठे मातीकाम करून रामपूर तलावाकडे वळविल्याने काही प्रमाणात यावर मात करता आली.हे जरी खरे असले तरी दुर्गा मंदीर परिसरातील तलावात पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग संकुचित व अल्प असल्याने मोठ्या भूभागावर पावसाळ्यात घाण पाणी पसरून शहराचा मोठा भाग प्रभावीत होतो.

         सा.बा.विभागाने २०२४ मध्ये शहरातील काँक्रिट राष्ट्रीय महामार्ग संपताच रोड फोडून क्रास पाईप टाकून निचरा वाढविण्याचा प्रयत्न केलेला दिसते. मात्र येत्या पावसाळ्यात पुन्हा हे जिवघेणे संकट उभे टाकेल तर नाही ना ! हि भिती आता घर करणार आहे.

***

नविन मुख्याधिकाऱ्यांना थोडे गंभीर व्हावे लागेल.

           न.प.मुख्याधिकारी शहर समस्येबाबत जागरूक असले की सुव्यवस्थेला तडा जात नाही असे जाणकार बोलतात.

       समस्या लोकांनी समोर ठेवाव्यात व आपण कर्मचाऱ्यांचा सल्ला घेऊन नंतर बघू अशी धारणा असणारे विशेषतः शहर प्रशाशन सांभाळणारे अधिकारी बदलून जातात पण जनतेची आपूलकी सोबत घेऊन जात नसतात.

              काही दिवसांपूर्वी मूल न.प.मध्ये मुख्याधिकारी म्हणून आलेले संदिप डोडे यांच्यात शहरवासीयांना कामाची चुणूक आढळून आलेली आहे. शहरातील सुरक्षितता लक्षात घेऊन स्वता पुढाकार घेऊन शहरातील १६ ठिकाणांवरील कॅमेरे वाजागाजा न करता कामी आणण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद ठरले आहे. ही जबाबदारी तशी पोलिस विभागाची. पण चांगले, जबाबदार प्रशासकीय अधिकारी  जबाबदारी न झटकता काम करतात.

         मूल शहरातील पावसाळ्यातील पुरसदॄष स्थिती दूरगामी हाकलून लावण्यात मुख्याधिकारी संदिप दोडे महत्वाची भुमिका पार पाडून नगर वासियांना मोठा दिलासा देऊ शकतात.समस्या गवसली आहे.साधनांची कमतरता नाही. मोठा खर्चही नाही.पुढाकार तेवढा ध्यावा लागेल.