
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
भारतीय कृषी अनुसंधान परिषद केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर मार्फत अनुसूचित जाती विकास कृती आराखडा (डी ए पी एस सी) योजने अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण तथा प्रक्षेत्र दौरा या कार्यक्रमाचे आयोजन नायगाव, येथे करण्यात आले होते.
केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, येथील डॉ. जयंत मेश्राम प्रमुख शास्त्रज्ञ, पीक उत्पादन विभाग तथा नोडल ऑफिसर आर. एम. रामटेके वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, अब्दुल वसीम, तांत्रिक सहाय्यक, एस. आर. रामागडे कृषी अधिकारी, पंचायत समिती दर्यापूर रोशन काळे, सरपंच, ग्राम पंचायत नायगाव, तथा नायगाव येथील शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. जयंत मेश्राम यांनी उपस्थित लाभार्थ्यांना अनुसूचित जाती संवर्गामध्ये उत्पन्न निर्मिती योजना, तथा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जातींचे विकास व जीवनशैली सुधारणे, कृषि आधारित नवीन रोजगार निर्मिती संभावना, शेतीपूरक जोडधंदा इत्यादी बद्दल माहिती दिली.
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमार्फत शेतकऱ्यांसाठी अनुसूचीत जाती उपयोजना अंतर्गत विविध पिक प्रात्यक्षिकांचे आयोजनाची माहिती तसेच संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ध्वनि संदेश सेवेचा लाभ घ्यावा तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हलक्या ते माध्यम स्वरुपाच्या आहेत त्यांनी येणाऱ्या हंगामात कपाशीची पेरणी सघन लागवड पद्धतीने करावी असे आवाहन केले.
यावेळी आर. एम. रामटेके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हलक्या ते माध्यम स्वरुपाच्या जमितीत कपाशीची सघन लागवड करून एकरी उत्पन्न वाढविण्यावर भर दिला, तथा एकात्मिक अन्नद्रव्य आणि तन-नियंत्रण व्यवस्थापन या विषयी विस्तृत माहिती दिली.
एस. आर. रामागडे यांनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध कृषी विषयक योजनांची माहिती दिली तसेच शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सुत्रसंचालन भूषण खंडारे यांनी केले तर अब्दुल वसीम यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे शेवटी गावातील कपाशीच्या शेतांची पाहणी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये नंदकिशोर हिवराळे, निखिल मनोहरे विजय गायकवाड, अश्विन मेश्राम आणि यांचे मोलाचे सहकार्य लाभले.