आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी ॲड.राजेंद्र उमाप यांची निवड…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीच्या प्रमुख विश्वस्तपदी ॲड.राजेंद्र उमाप यांची निवड झाल्याची माहिती आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.

           श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीची सभा पुणे येथील कार्यालयात मावळते प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे अध्यक्षतेखाली झाली. यासभेस विश्वस्त ॲड.विकास ढगे पाटील, योगी निरंजननाथजी, डॉ.भावार्थ देखणे उपस्थित होते. विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख हे अनुपस्थित होते.

            राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या उपाध्यक्ष म्हणून ॲड.राजेंद्र उमाप हे काम पाहत आहेत. नुकतीच त्यांची संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तपदी निवड झाली आहे. त्यांच्या बरोबर योगी निरंजननाथजी, डॉ.भावार्थ देखणे यांची सुध्दा निवड करण्यात आली आहे.

             उर्वरित तीन जागा वर तत्कालीन विश्वस्त योगेश देसाई, विकास ढगे पाटील, लक्ष्मीकांत देशमुख यांना मार्च महिन्यापर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. मार्च महिन्यानंतर उर्वरित तीन जागा भरण्यात येणार असून त्यात स्थानिक आळंदीकर ग्रामस्थांची नेमणुक करण्यात येईल का नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.