डॉ.नारायण महाराज जाधव यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार जाहीर…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्र शासनाचा २०२३ सालचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार आळंदी येथील वारकरी संप्रदायातील अभ्यासू, विद्वान गुरुवर्य हभप डॉ.नारायण महाराज जाधव यांना जाहीर झाला आहे. डॉ.नारायण महाराज जाधव हे वेदांत सत्संग समितीचे प्रमुख आहेत तसेच वारकरी साधकांचे आदर्श अध्यापक आहेत. त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वारकरी संप्रदाय व आळंदीकर ग्रामस्थाना आनंद झाला आहे.

           संत साहित्यावर उत्कृष्ट लेखन करणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये ५ लक्ष रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. ज्यांनी आपले सारे आयुष्य संत साहित्याचा अभ्यास कराण्यात घालवले अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळतो.

           या प्रकारच्या पुरस्कारांत हा सर्वांत मानाचा सन्मान समजला जातो. यापुर्वी आळंदीतील शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर व डॉ.किसन महाराज साखरे यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.