चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली:-
येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब साकोली व कटकवार हायस्कुल ग्लोबल नेचर क्लबच्या सर्पमित्र चमुला दुर्मिळ प्रकारचा अलबिनो मण्यार प्रजातीचा साप युवराज बोबडे व गोविंदा धुर्वे यांना पंचशील वॉर्डातील रमाबाई चौक येथे राहणारे लोकचंद बहावे यांचे घरी सुरक्षित सुटका करताना आढळला.सुरवातीला त्यांना धुळनागीन(बँडेड रेसर) प्रकारचा साप असावा असे वाटले पण बारकाईने निरखून पाहिले असता अर्धवट अलबिनो मण्यार असल्याचे दिसून आले.
याबद्दल अधिक माहिती देताना ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब साकोली-लाखनीचे कार्यवाह व कटकवार हायस्कुल ग्लोबल नेचर क्लब साकोलीचे संघटक प्रा. अशोक गायधने यांनी सांगितले की सर्वसाधारणपणे कॉमन क्रेट किंवा मण्यार साप हा काळसर रंगाचा व त्यावर वर्तुळाकार पांढऱ्या दोन टिम्ब टिम्ब असलेल्या रेषा असतात. पण ह्या सापडलेल्या मण्यार सापाला मात्र मेलॅनिन या रंगद्रव्याची कमतरता जन्मतः असल्याने काळसर रंग नाहीसा होऊन अर्धवट फिक्कट रंग तयार झाला आहे.अशा प्रकारच्या घटनेला इंग्रजीत ‘अलबिनेजीझम’ तर मराठीत ‘रंजकविहीनता,वर्णविहिनता किंवा धवलरोगी’ घटना संबोधिले जाते अशी माहिती त्यांनी दिली.अर्धवट रंगविहिन झालेल्या मण्यार सापांना ‘पार्शीअल अलबिनो क्रेट” असे ओळखले जाते.मण्यार प्रजातीचे साप निशाचर असून व अत्यंत विषारी असतो त्याची लांबी चार फुटाची आहे याचे शास्त्रीय नाव ‘बंग्यारस सेरुलिअस’असे असून ग्रामीण भागात ह्याला ‘दांडेकार’ साप संबोधले जाते. ह्या सापांचे सर्पदंश होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे.याचे कारण यांचे दात बारीक असल्याने सर्पदंशाची घटना लवकर लक्षात येत नाही.त्यामुळे मृत्यू पावण्याचे प्रमाण जास्त आहे अशी पण माहिती त्यांनी पुरविली आहे. या अलबिनो मण्यार सापाची ओळख पटविल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात युवराज बोबडे,गोविंदा धुर्वे, रोशन बागडे यांनी काही काळाने सोडले.यापूर्वी इतर सापांच्या प्रजातीचे अलबिनो प्रकार विदर्भात आढळले परंतु मण्यार जातीचा अलबिनो विदर्भात प्रथमच आढल्याने सर्पअभ्यासक चंदू परतेकी,आशिष वलथरे,गुणवंत जिभकाटे, कैलाश वलथरे,यश तिडके,सौरभ चचाणे तसेच लाखनी ग्रीनफ्रेंड्सचे सर्पमित्र मयुर गायधने,पंकज भिवगडे,विवेक बावनकुळे,धनंजय कापगते,नितीन निर्वाण,सलाम बेग इत्यादींनी साकोली सर्पमित्र चमूचे अभिनंदन केले आहे.