रोशन कंबगौनिवार / प्रतिनिधि, राजाराम
राजाराम:-आपला देश विविधतेने नटला आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे राहतात. समाजातील लोकांचा विकास करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपापसात सहकार्य व प्रेम भावना निर्माण करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे. त्यासाठी आदिवासी समाजानेसुद्धा संघटित व्हावे,असे उद्गार माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी काढले.बिरसा ब्रिगेड, विर बाबुराव शेडमाके स्मारक समिती,आदिवासी उत्सव समिती तथा सर्व आदिवासी बहुजन समाज आलापल्ली तर्फे येथील क्रीडा संकुलाच्या भव्य पटांगणात दंडकारण्य राष्ट्रीय आदिवासी तथा सर्वहारा बहुजन समाज एस. सी.,एस.टी.,एन.टी.,ओ. बी. सी. महाप्रबोधनात्मक एक दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले.या संमेलनाचे उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी महाप्रबोधन संमेलनाचे अध्यक्ष तसेच प्रमुख वक्ते म्हणून बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश दादा आत्राम,प्रमुख अतिथी म्हणून बिरजू गेडाम,अरुण धुर्वे,विलास कोडाप,सुधाकर चांदेकर,गणेश वरखडे, डॉ किशोर नैताम,विजय राठी पिटने, प्रकाश मट्टामी,चंद्रप्रकाश कोरडे, संघमित्र बौद्ध विहार आलापलीचे अध्यक्ष कार्तिक निमसरकार,जांबिया गट्टाचे सरपंच पूनम लेकामी,नागेपल्ली चे ग्रा प सदस्य लक्ष्मी सिडाम,ग्रा प सदस्य शारदा कडते,मीराबाई सडमेक, पुष्पाताई अलोने,सुशील भगत, भीमरावआत्राम,माजी सरपंच सांबय्या करपेत,माजी सरपंच बालाजी गावडे,वशील मोखाशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख वक्ते म्हणून सतीश पेंदाम यांनी समाजातील जातीपातीच्या राजकारणावर कडाडून टीका करतानाच आदिवासी समाजामुळेच पर्यावरण टिकून असल्याचे मत व्यक्त केले.जल,जंगल आणि जमीन हा जगातील महत्वाचा दुवा आहे. यातील जंगल वाचवण्याचे काम आदिवासी समाजानं केलं आहे.सध्या आदिवासीमुक्त भारत करण्याचा षडयंत्र रचला जात आहे.असे षड्यंत्र थांबवायचे असेल तर संपूर्ण समाज एकत्र येण्याची गरज आहे. मात्र, त्यासाठी समाज जिवंत असणेही गरजेचं आहे.म्हणून आतापासून जागृत व्हा अन्यथा एकेकाळी आदिवासी समाज होता,असं म्हणण्याची वेळ येईल. सध्या समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा व गैरसमज पसरवून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न चालवला जात आहे.अशांपासून समाजाने सावध राहण्याची गरज आहे. मनुवादी आणि मनीवादी वृत्तीचा देशाला धोका आहे.विशेष म्हणजे एस सी,एस टी, एन टी आणि ओबीसी तसेच आदी समाजबांधवांनी एकत्र येऊनच अशा कपटी शक्तीच्या विरोधात जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून रोतिबेटीचे व्यवहार करतानाच एकसंधपणे लढा उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या महाप्रबोधनात्मक एक दिवसीय संमेलनात एस टी, एस सी,एन टी तसेच ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास कोरेत,आभार आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम यांनी मानले,तर संचलन गणेश इरपाची यांनी केले.