बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी राजवर्धन हर्षवर्धन पाटील व सतीश उत्तमराव काळे यांची निवड करण्यात आली. सदरच्या नियुक्तीचे पत्र माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मंगळवारी देण्यात आले.
इंदापूर तालुक्यातील युवा उदयमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले राजवर्धन पाटील हे उच्चशिक्षित असून ते शहाजीनगर येथील निरा भिमा कारखान्याचे संचालक, इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. उत्कृष्ट संघटक व वक्तृत्व वक्ते असलेले युवा नेते राजवर्धन पाटील यांना शेतकऱ्यांच्या व जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. तसेच जनतेमध्ये मिसळण्याचा स्वभाव व तालुक्यातील जनसंपर्कामुळे त्यांनी सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्थान निर्माण केले आहे. तसेच दुसरे तज्ञ संचालक सतीश काळे हे डिकसळ परिसरात गेली अनेक वर्षे राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रात सक्रियरीत्या कार्यरत आहेत. या दोघांचे निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.