विधानसभेच्या निवडणूक संबंधाने राजकीय पक्षांचे खलबते…

प्रदीप रामटेके 

 मूख्य संपादक 

       महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आली असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी खलबते केली असून आपापल्या परीने विधानसभेचे मनमैदान पणाला लावणार आहेत.

          तिन्ही सत्ता पक्षाच्या प्रमुखांनी,”मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या,माध्यमातून विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे.”मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना,आम्हाला तारेल,असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना वाटते आहे.

          याचबरोबर तिन्ही सत्ताधाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सुध्दा असेच वाटते आहे.तद्वतच सत्ताधाऱ्यांनी सुध्दा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना निवडणूक पुर्व महाराष्ट्र राज्यात बोलावून विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

          दुसरीकडे देशाचे माजी कृषिमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी नियोजनबध्द कार्यपद्धतीचा अवलंब करीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ केलाय व पथनाट्याच्या माध्यमातून सत्तापक्षाची हवा गोल करण्याचे काम सुनिश्चित केले.

      तद्वतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याध्यक्ष आमदार व माजीमंत्री जयंत पाटील,खासदार सुप्रियाताई सुळे,खासदार अमोल कोल्हे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरदचंद्र पवार पक्ष) फडी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचे मैदान जिंकण्यासाठी उघड आणि गोपनीय कामाला लागली असल्याचे त्यांचे कार्यक्रम सांगून जातात.

          याचबरोबर माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवराव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रचाराच्या स्तंभाला गोपनीय ठेवले असून ते सत्ताधाऱ्यांची वेळेवरच पोलपट्टी खोलीतील असे दिसते आहे.

         मात्र,शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्य पिंजून काढीत आहेत आणि सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षम कर्तव्याचा सर्व घटनाक्रम पुराव्यानिशी गोळा करीत आहेत,त्यावरुन हे लक्षात येते की सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमपणाची उध्दळण हे प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीत होणार आहे.

           राष्ट्रीय काँग्रेस पक्ष म्हणजे निवडणूकांबाबत महागोपनीय कार्याचा भाग,मात्र महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नाना पटोले,विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात,यांनी सुध्दा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या सोबत चर्चा करून निवडणूकीचे बिगुल ठरवीले आहे.

        राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी जिवाचे रान करणार आहे आणि सत्ताधाऱ्यांना सत्ताच्युत करण्यासाठी व निवडणूकीत यशस्वी होण्यासाठी खासदार राहुल गांधी यांची कोल्हापूर भेट बरेच सांगून जाते आहे.

        एकंदरीत सत्ताधारी व विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा जिंकण्यासाठी कामाला लागले आहेत हे त्यांच्या हालचाली वरुन लक्षात येते आहे.