दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
ओल्ड ब्रिज, न्यू जर्सी येथे आंबेडकर इंटरनॅशनल मिशन (एआयएम) द्वारे ६८व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसा चे आयोजन करण्यात आले.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीने प्रेरित जणांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. न्यू यॉर्क, न्यू जर्सी आणि पेनसिल्व्हेनिया तसेच भारतातील जेष्ठ प्रवासी नागरिक मिळून शेकडोच्या संख्येने लोक उपस्थित होते.
आध्यात्मिक चिंतन, बौद्धिक चर्चा आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी परिपूर्ण अश्या या कार्यक्रमास सर्व वयोगाटातील उपस्थिती लक्षणीय होती.
कार्याकार्माचे प्रमुख वक़्ते रेव्ह. टी.के. नागाकगी, (न्यू यॉर्क बौद्ध परिषदेचे मानद अध्यक्ष) यांनी ‘शांती आणि सामंजस्य’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. बौद्ध तत्त्वज्ञानातील करुणा, संघ भावना आणि अहिंसा या मुल्यांवर आधारित शांतीपूर्ण समाज निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. आजच्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी या शाश्वत मूल्यांचे महत्त्व त्यांच्या प्रभावी भाषण शैलीने पुन्हा एकदा स्पष्ट केले.
एआयएमचे वरिष्ठ सदस्य आयु. मिलिंद आवसरमोल यांनी नुकत्याच आलेल्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या “शेड्यूल्ड कास्ट कोट्यांचे उपविभाजन तसेच क्रीमी लेयर” संबंधित निर्णयावर सखोल चर्चा केली.
सदर भाषणात या न्यायालयीन निर्णयाचे दूरगामी कायदेशीर परिणाम तसेच दलित समाजासाठी असलेल्या घटनात्मक आरक्षण व सामाजिक न्यायाच्या दिशा याचेही अत्यंत प्रभावी विश्लेषण करण्यात आले.
कार्यक्रमातील दुपारच्या सत्रात ‘भारतीय राज्यघटनेच्या समग्रतेस आव्हाने, बहुजन राजकारणाचा उगम आणि विकास, महिला नेतृत्व आणि सामाजिक न्यायापुढील आव्हाने’ या विषयावर एक अत्यंत विचारप्रवण चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले. एआयएमच्या सदस्यांनी या चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतला आणि भारताच्या सामाजिक व राजकीय परिप्रेक्ष्यात या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली.
भावपूर्ण गायन, बहारदार नृत्ये यांच्या सदरीकारणाने कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत झाली. सर्व वयोगटातील स्त्री, पुरुष यांनी यात सहभाग घेतला. तसेच बालवयीन मुलांच्या प्रेरणादायक भाषणांचाआनंद उपस्थितांनी घेतला.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी बौद्ध समुदायातील विविधतेचा आणि एकतेचा उत्सव साजरा करीत, सांघिक एकात्मतेला प्रोत्साहित केले.
आंतरराष्ट्रीय पटलावर यशस्वीरित्या पार पडलेल्या या कार्यक्रमाने बौद्ध शिकवण, सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांवर विचार मांडण्याची एक महत्त्वपूर्ण मंच प्रदान केला. तसेच या द्वारे सर्व समविचारी बांधवाना एकत्र येण्याची, शिकण्याची आणि एकसंघ होण्याची उत्तम संधी प्राप्त झाली.