बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी
निमगाव केतकी ता.इंदापूर येथे महाराष्ट्र केसरीसाठी तालुकास्तरीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धेला सुरवात झाली असुन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक कुस्ती पट्टूचे स्वप्न असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी आज औपचारिकपणे तालुकास्तरीय निवड चाचणी चालु झाली असून यामध्ये अनेक नामांकित मल्लांनी सहभाग घेतल्याने निमगावनगरी कुस्तीगीरांनी गजबजुन गेली आहे.याठिकाणी पिळदार आणि धष्टपुष्ट शरीरयष्टी असलेले अनेक उदयोन्मुख पैलवान कुस्तीशौकिनांचे लक्ष वेधुन घेत आहेत.
या प्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की,इंदापुर तालुका हा खऱ्या अर्थाने कुस्तीपटूंचा तालुका म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहे.आपल्या मातीतील अनेक मल्लांनी कुस्तीला राजाश्रय मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.कुस्तीचा हाच वारसा पुढे नेटाने जोपासण्यासाठी आज अनेक उदयोन्मुख मल्ल तयार झाले असून त्यांनी महाराष्ट्र केसरीची गदा इंदापूर तालुक्याला मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी अशी अपेक्षा आमदार भरणे यांनी व्यक्त केली.
तसेच कुस्तीपटूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण आपल्या तालुक्यातच मिळावे यासाठी प्रयत्नशील असून यासाठी मारकड कुस्ती प्रशिक्षण केंद्रासह तालुक्यातील इतर आखाड्यांना सुद्धा आपण कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,आयोजकांनी या स्पर्धेचे अतिशय उत्तम पद्धतीने आयोजन केले असल्यामुळे मल्लांबरोबरच कुस्तीशौकिनांना हि निवड चाचणी स्पर्धा आनंदाची पर्वणी ठरेल यात तीळमात्र शंका नसल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.यानंतर काही काळासाठी त्यांनी कुस्ती पाहण्याचा आनंद घेत उपस्थित सर्व मल्लांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मुख्य आयोजक आणि मार्केट कमिटीचे संचालक तुषार जाधव,पै.सचिन जाधव,कुस्तीगीर संघटनेचे तालुकाध्यक्ष पै.अशोक चोरमले,उपाध्यक्ष पै.सचिन बनकर,पै.हनुमंत रेडके,पै.कुंडलिक कचरे,पै.युवराज नरूटे,पै.हनुमंत पवार,पै.योगेश शिंदे यांच्यासह अनेक नामांकित मल्ल,कुस्ती प्रशिक्षक व कुस्तीशौकिन मोठ्या संख्येने उपस्थित होते.