ऋषी सहारे
संपादक
आरमोरी-
उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाची पडताळणी तसेच गुणात्मकदृष्ट्या दर्जा देण्यासाठी भारत सरकारच्या अधिनस्थ व विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली संचालित नॅकची बँगलोर येथे 1994 पासून स्थापना करण्यात आली. ही समिती महाविद्यालयाचे गुणात्मकदृष्ट्या पडताळणी करून महाविद्यालयाला मानांकन देत असते. नॅकमार्फत करण्यात आलेल्या चवथ्या मूल्यांकनात आरमोरी येथील मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालयाला नॅकचा पुनर्मानांकित ‘अ’ दर्जा (3.24 सी.जी.पी.ए.) प्राप्त झाला. परिणामी हे महाविद्यालय गोंडवाना विद्यापीठात सर्वोच्च मानांकित महाविद्यालय ठरले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, दलित, गोरगरीब विद्यार्थ्याना शिक्षण मिळावे ते स्वावलंबी व उत्तम नागरिक व्हावेत यासाठी मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्व. वामनरावजी वनमाळी, स्व. किशोरभाऊ वनमाळी, संस्थेचे विद्यमान सचिव मनोजभाऊ वनमाळी, अध्यक्षा श्रीमती सुनीताताई वनमाळी यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य आणि गुणसंपन्न ज्ञानदानासाठी तसेच सामाजिक, सांस्कृतिक स्वास्थासाठी कटिबद्ध असलेले हे महाविद्यालय आहे. प्रगतिशील आणि विकसनशील उदात्त ध्येय उराशी बाळगूण गेल्या तीन तपाहून अधिक काळापासून महात्मा गांधी महाविद्यालय ज्ञानक्षेत्रात यशाची वाटचाल करीत आहे. त्याचेच फलित म्हणजे या महाविद्यालयाला नॅक बंगलूरुने पुनर्मानांकित ‘अ’ दर्जा देऊन महाविद्यालयीन गुणात्मक कार्याचा गौरव केला आहे.
महाविद्यालयाचे चवथे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी दि. 07 व 08 सप्टेंबर 2022 ला नॅकच्या त्रीसदस्यीय समितीने महाविद्यालयाला भेट दिली. त्यात नॅक पीअर टिमचे अध्यक्ष डॉ. शरणप्पा हलसे, नॅक पीअर टिम समन्वयक डॉ. डी. एस. दहिया, नॅक पीअर टिम सदस्य डॉ. अजय सक्सेना यांचा समावेश होता. त्यांनी महाविद्यालयाने गेल्या पाच वर्षात करिक्युलर आस्पेक्ट, टिचिंग लर्निंग अँड इव्हाल्युएशन, रिसर्च, कंसलटन्सी अँड एक्सटेंशन, इन्फ्रास्ट्रक्चर अँड लर्निंग रिसोर्सेस, स्टुडंट सपोर्ट अँड प्रोग्रेशन, गवर्नन्स, लिडरशीप अँड मॅनेजमेंट, इनोवेशन अँड बेस्ट प्रॅक्टीसेस अशा विविध निकषांनुसार जे कार्य केले गेले त्याचे गुणात्मकदृष्ट्या पडताळणी करून कागदपत्रांची तपासणी केली. शिवाय महाविद्यालयातील कला, विज्ञान व वाणिज्य शाखेंतर्गत पदवी, पदव्युत्तर विभागांना आणि रिसर्च सेंटर्सला व विविध समित्यांना भेट दिली. पालक तसेच माजी विद्यार्थी व आजी विद्यार्थी यांच्याशी सुसंवाद साधला. महाविद्यालयीन प्रशासकीय कामकाजाची पडताळणीही केली. मॅनेजमेंटशी संवाद साधून महाविद्यालयीन गुणात्मक बाबींशी चर्चा केली. महाविद्यालयाचे विविध स्तरांवर असेसमेंट करून नॅकच्या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयीन मूल्यांकनाचा अहवाल सादर केल्यानंतर एका विशेष बैठकीत शिक्कामोर्तब होऊन दि. 13 सप्टेंबर 2022 ला महात्मा गांधी महाविद्यालयाला नॅक पुनर्मानांकित ‘अ’ दर्जा (3.24 सी.जी.पी.ए.) बहाल केला. महाविद्यालयाची गुणात्मक वाटचाल सातत्याने सुरू राहिली आहे. 2004 मध्ये ‘बी’ ग्रेड, 2012 मध्ये महाविद्यालयास 2.88 ‘बी’ प्लस, 2017 मध्ये 3.02 ‘अ’ दर्जा व 2022 मध्ये 3.24 नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त झाला. ही वाटचाल निश्चितच भूषणावह, प्रेरणादायी व दिशादर्शक आहे.
अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि गुणात्मक विस्तार, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या टप्प्यांवर महाविद्यालयाने आपली वाटचाल प्रगतिपथावर कायम ठेवली. मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोज वनमाळी, अध्यक्षा श्रीमती सुनीताताई वनमाळी, सदस्य मयूर वनमाळी, संस्थेचे समस्त पदाधिकारी, महाविद्यालयातील आय.क्यु.ए.सी. चे समन्वयक व सर्व सदस्य, समस्त प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सामूहिक मेहनतीचे हे फलित असल्याची प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी व्यक्त केली.
महाविद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सुनिताताई वनमाळी, सचिव मनोजभाऊ वनमाळी, उपाध्यक्ष नूरअल्लीभाई पंजवानी, सहसचिव दिपक बेहरे, संस्थेचे पदाधिकारी दिपक वनमाळी, अशोक वनमाळी, नामदेवराव सोरते, हरिश्चंद्र बोंदरे, उमाकांत वनमाळी, मयूर वनमाळी, प्रकाश भोयर, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल गोंडवाना विद्यापीठ परिसर व गडचिरोली परिसरातील मान्यवरांनी, विविध संस्थांनी आणि अधिकारी वर्गाने अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. यापुढेही विविध नावीन्यपूर्ण व कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम, पीएच.डी. रिसर्च सेंटर्स, विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना आणण्याचा मानस असल्याचे संस्थेचे सचिव मनोजभाऊ वनमाळी यांनी व्यक्त केले.