कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी : घरी कुणीही नसताना तरुणाने स्वयंपाक खोलीतील छताला दोरीच्या मदतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली असल्याची हृदयद्रावक घटना घडली.ही घटना पारशिवनी शहरात घडली असून,रविवारी (दि. १४) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सागर गणेश झुरे (२५, रा. प्रभाग क्रमांक-२, दत्तटेकडी, पारशिवनी) असे मृत तरुणाचे नाव आहे.सागर हा त्याच्या आईसोबत राहायचा.या दोघांशिवाय घरी तिसरे कुणीही नव्हते.त्याची आई रविवारी सकाळी मजुरीसाठी कामावर निघून गेली होती.
त्यामुळे सागर घरी एकटाच होता. ती सायंकाळी घरी परत आल्यावर तिला सागर स्वयंपाक खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
तिने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना सूचना दिली.पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
सागरने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली असावी,अशी शक्यता काहींनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.