अबब! मांडवलच्या पोटातून एकामागुन एक बाहेर पडली तब्बल 19 पिल्ले! –ग्रीनफ्रेंड्सच्या सर्पमित्रांनी अनुभवला दुर्मिळ क्षण..   — ग्रीनफ्रेंड्सच्या सर्पमित्रांनी व वनविभागा लाखनीने दिले 20 मुकी मांडवल सापांना जीवदान..

 

    चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

 

लाखनी:-

     मुरमाडी सावरी येथे विष्णू नामदेव ईश्वरकर यांचे घरी मुकी मांडवल (इंग्रजी नाव -कॉमन सँड बोआ) हा साप असल्याची माहिती ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचा सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे याला मिळाली.

     त्याने तात्काळ घटनास्थळी जाऊन मुकी मांडवल सापाला ताब्यात घेऊन सुरक्षित सुटका केली.पण काही वेळाने मुकी मांडवल सापाने पोटातून पिल्ले देण्यास सुरुवात केली.

      एकामागुन एक पिल्ले अशी तब्बल 19 पिल्ले 10 मिनिटाच्या अवधीत बाहेर पडली.ह्या दुर्मिळ घटनेचे साक्षीदार अनेक नागरिक व ग्रीनफ्रेंड्सचे सर्पमित्रांनी ह्या अदभुत घटनेचा आखो देखा हाल’ अनुभवला.

       ह्या घटनेविषयी माहिती देताना ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी सांगितले की मुकी मांडवल, विषारी घोणस,फुरसे,बांबू पिट व्हायपर, तसेच बिनविषारी मांडोळ प्रजातीचे साप अंडे बाहेर न देता पोटातच अंडे फलित होऊन ते थोडे मोठे झाले की बाहेर पिल्ले पोटातील अंड्यातून परिपक्व झाल्यावर बाहेर पडतात.

     जरी हे साप पोटातून पिल्ले देत असतील तरी यांना सस्तन प्राणी गटात टाकू नये तर हे सरपटणारे प्राणी रेपटाइल्स गटातच मोडतात अशी माहिती त्यांनी पुरविली. 

     या घटनेची माहिती वनपरीक्षेत्राधिकारी सुरज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली लाखनी क्षेत्रसहाय्यक जे एम बघेले, बिटरक्षक गडेगाव एम एल शहारे मॅडम,बिटरक्षक त्रिवेणी गायधने मॅडम तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे सर्पमित्र सलाम बेग,मनीष बावनकुळे यांच्या सोबतीने सदर साप व पिल्लांना लाखनी पशुवैद्यकीय चिकित्सालयात नेण्यात आले.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत फडके व डॉ. देशमुख मॅडम यांनी सदर सापांची व पिलांची तपासणी करून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. यावेळी वनाधिकारी व वनकर्मचारी यांनी मौका पंचनामा नोंदविला.

      मुकी मांडवलच्या 19 पिलांना तसेच मादी सापाला जीवदान दिल्याबद्दल सर्पमित्र पंकज भिवगडे, मयुर गायधने,गगन पाल,नितीन निर्वाण,धनंजय कापगते, दिघोरे यांनी विवेक ,मनीष व सलामचे अभिनंदन केले आहे.या घटनेची लाखनी तालुक्यात एकच चर्चा सुरू आहे.