जनसामान्य नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे :-  मुख्याधिकारी कैलास केंद्रे… — डुडूळगाव येथे २११ रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपले सामाजिक दायित्व पार पाडले…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

आळंदी : सिकलसेल सारख्या आजारावर मात करण्यासोबत विविध शस्त्रक्रिया आणि दुर्धर आजारात रक्ताची नितांत आवश्यकता असते.

        प्रत्येकाला वेळेवर रक्त मिळावे यासाठी रक्त संकलन आवश्यक आहे. जिल्ह्यात रक्त तुटवडा भासू नये म्हणून रक्तदान मोहिम गरजेची आहे. यामुळे जनसामान्य नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले. आळंदी-मोशी रोडवरील वेदश्री तपोवन परिसरात सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण आणि मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. योवळी ते बोलत होते.

         राहुल चव्हाण आणि मित्र परिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन आळंदी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विलास काटे, महादेव पाखरे, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, दिनेश घुले, नंदकुमार वडगावकर, आशिष गोगावले, सचिन तळेकर तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबीरास युवकांनी उत्तम प्रतिसाद देत २११ रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपले सामाजिक दायित्व पार पाडले.यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना तुळशीचे रोप, प्रमानपत्र आणि जीवनावश्यक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी आळंदी नगरपरीषदेचे माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांनी आजपर्यंत ३५ वेळेस रक्तदान केले. रक्तदान करून आपण अनेकांचे जीव वाचवू शकता त्यामुळे रक्तदान करुन आपण आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे असे आवाहन यावेळी गिलबिले यांनी केले.

        वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरीही रक्ताला पर्याय नाही. रक्तदानासारखे श्रेष्ठ दान कोणतेही नाही. निरोगी व्यक्तीद्वारे केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी केले जाते. त्यामुळेच रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान असे संबोधले जाते. रक्तदान है आपले सामाजिक कर्तव्य आहे. रक्तदान हे निःस्वार्थ भावनेने केले पाहिजे. कारण आपल्या एका रक्तदानातून कुणाला तरी जीवदान मिळणार आहे असे प्रतिपादन आयोजक राहुल चव्हाण यांनी सांगितले.