
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : मद्यपींचा विशेष सण म्हणजे “रंगपंचमी” आणि या सणाला जो नाही पित तो ही दारू पितो. पण येथे होळी रंगपंचमीला शंभरावर मद्यपी हे मद्यमुक्त होते हे कसे.? हे यातील विशेष. जागतिक संघटना अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस, आत्मसमर्पण आंतरसमुह भंडारा – गोंदिया – गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्ह्यातील सौंदड रेल्वे येथे जिल्हा परिषद हायस्कूल प्रांगणात “होळी फेलोशिप” चे आयोजन गुरू. १३ व शुक्र. १४ मार्चला करण्यात आले. येथे मोफत “मद्यपाश नावाचा एक जिवघेणा आजार” यावर दोन दिवस जनजागरण सभाही संपन्न झाली.
जागतिक आरोग्य संघटनेनेही नमूद केले आहे की, मद्यपाश एक आजार आहे. आणि हा आजाराचा शेवट अकाली मृत्यू हाच आहे. या रंगपंचमी सणाला तो आजार उफाळून येऊ नये यासाठी दोन दिवसीय होळी फेलोशिपचे आयोजन सौंदड रेल्वे येथे झाले. यात ता. १३ व १४ मार्चला दोन सत्रात – मद्यपी बांधव नवागतांचे स्वागत व अनुभव कथन, मद्यपाश एक जीवघेणा आजार यावर जनजागरण सभा, मद्यमुक्तीत येणारे अडथळे व उपाय, माझ्या मद्यमुक्त जीवनाची “एए” गुरूकिल्ली, दारू थांबली आता पुढे काय, रिकव्हरी सोबत आध्यात्मिक सुधारणा, जगा व जगु द्या, माझा समुह माझी जबाबदारी या विषयावर हे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
येथे लाखांदूर, भंडारा, साकोली, गोंदिया, देसाईगंज, आमगांव, बाम्हणी, सुंदरी येथील शंभरावर बांधवांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या रंगपंचमी सणाला या कार्यक्रमाला अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस मध्ये आलेले व नविन अट्टल मद्यपी बांधव हे या दिवशीही मद्यमुक्त होते. सदर आयोजन आत्मसमर्पण आंतरसमुह भंडारा गोंदिया गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झाले.
या होळी रंगपंचमी फेलोशिपला निर्णय समुह सौंदड रेल्वे, युनिटी समुह साकोली, मानवता समुह लाखांदूर, निर्माण समुह बाम्हणी/ख, सुंदरी चारगांव समुह येथील सर्व बांधवांनी विशेष सहकार्य करीत या “मद्यसक्त ते मद्यमुक्त” दोन दिवस निःशुल्क कार्यशाळेत अथक परिश्रम घेतले.
याप्रसंगी आयोजकांनी सांगितले की, ज्या कुणाला, कुटुंबातील सदस्यांना, मित्र परिवारातील ग्रसित व्यक्तींना दारूची भयंकर आदत असल्यास मोफत सभा दर रविवारी सायं. ४ ते ५:३० जि. प. हायस्कूल सौंदड रेल्वे, दर मंगळवार सायं. ६ ते ७:३० जि. प. प्राथ. शाळा गणेश वार्ड साकोली, दर शुक्रवार सायं. ५ ते ६:३० जि. प. प्राथ. शाळा बाम्हणी खडकी, दर रविवार सायं. ४ ते ५:३० शिवाजी विद्यालय लाखांदूर असे निःशुल्क सभेचा लाभ घ्यावा व मद्यमुक्त जीवनाचा आनंद घ्यावा असे आवाहन केले.