आळंदीत जरांगे पाटील यांचे स्वागत होणार भव्य..  — सन्मानार्थ मिरवणूक होणार!  — आळंदीतील सकल मराठा समाजाकडून जोरदार तयारी सुरू…

दिनेश कुऱ्हाडे

    उपसंपादक 

आळंदी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या गाठी-भेटी दौरे सुरु करणार आहेत.

         तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान जरांगे पाटील, रविवारी 19 नोव्हेंबरला पुण्याच्या भोर तालुक्यातील मराठा समाजाची भेट घेणार आहेत. भोरमधील शेटे मैदानावर संध्याकाळी 4 वाजता जरांगे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी रायगड किल्ल्याचं दर्शन घेऊन जरांगे पाटील, वरंधघाट मार्गे भोरला येणार आहेत. भोरमध्ये 4 वाजता सभा घेऊन जरांगे पाटील श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी येणार आहे.नतर आळंदी येथे मुक्कामी जाणार आहेत.

          मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची आळंदीतील सकल मराठा समाजाकडून जोरदार तयारी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले असून सदर मिरवणूक चाकण चौक येथून सुरू होऊन प्रदक्षिणा मार्गावरून महाद्वार चौकात येईल नंतर ते संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतील. मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार असून रात्री ते आळंदीत मुक्कामी असणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तुळापूरकडे मार्गस्थ होईल अशी माहिती आळंदी येथील सकल मराठा समाजाचे सेवक अरुण कुरे व भागवत शेजूळ यांनी दिली.

           सकल मराठा समाज आळंदी सर्कल यांच्या वतीने जरांगे पाटील यांच्या दौऱ्याबाबत आळंदी पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले. या निवेदनाचा स्वीकार आळंदी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी केला. यावेळी डि.डि.भोसले, प्रकाश कुऱ्हाडे, शशीराजे जाधव, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, अर्जुन मेदनकर, सागर लाहुडकर, पुष्पाताई कुऱ्हाडे, श्रीकांत काकडे, दत्तात्रय फराटे उपस्थित होते.

           मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील आक्रमक आहेत. कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्याव, ही त्यांची मागणी होती. त्यानुसार राज्य सरकारने पावल उचलली आहेत. राज्यात सर्वत्र अभ्यासकाकडून शोध मोहिम सुरु आहे. कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. 24 डिसेंबरपर्यंत सर्व मराठ्यांना आरक्षण द्याव ही जरांगे पाटील यांची मागणी आहे.