दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : एखाद्या कुटुंबातील मृत व्यक्तीला दशक्रिया विधीला श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने झोडल्या जाणाऱ्या भाषणांमुळे हे घाट आता राजकारण्यांच्या मतपेटीचे अड्डे बनू लागले आहेत. याच अनुषंगाने आळंदी येथील दशक्रिया विधीला प्रवचन सेवा झाल्यानंतर कोणत्याही नेत्यांची श्रद्धांजलीपर भाषणाला बंदी घालण्यात आली असल्याचे सर्व आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने हा आदर्श निर्णय घेतला आहे अशी माहिती अरुणराव घुंडरे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, विलास कुऱ्हाडे, रमेश गोगावले यांनी सर्व ग्रामस्थांशी विचारविनिमय करून हा आदर्शवत निर्णय घेतला आहे. या आदर्शवत निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत केले जात आहे.
दशक्रियेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमधून नेत्यांच्या श्रद्धांजली अर्पण भाषणाबाबत नाराजीचा सूर निघत आहे. कोणत्याही गावात बहुतांश दशक्रिया विधी कार्यक्रमात श्रद्धांजली वाहणाऱ्यांची संख्या ७ ते ८ हून कमी नसते. एवढ्या मोठ्या संख्येने भाषणाद्वारे श्रद्धांजली अर्पण करणाऱ्यांची संख्या असेल तर उपस्थितांची किती गैरसोय होत असेल, याचा भाषण झोडणाऱ्यांना विसर पडतो. त्यातही सकाळी ९ वाजेपर्यंत उन हलके असते. त्यानंतर मात्र उन्हात बसलेल्या श्रोत्यांचे काय हाल होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी.
अनेकदा ही मंडळी वेळेचे भान न बाळगता श्रद्धांजलीच्या नावाखाली लांबलचक व रटाळ भाषणबाजी करतात, यामुळे दशक्रियेला उपस्थित राहिलेल्या जनसमुदायाचा वेळ नाहक वाया जात आहे. घाटावर आलेली बहुतांश मंडळी शेतकरी, मजूर, नोकरदार व नातेवाईक असतात, ज्यांना लवकरात लवकर आपल्या कामावर हजर व्हायचे असते. पण याचेही भान बोलण्याच्या नादात या नेते मंडळींकडून ठेवले जात नाही.
सकाळी ८ वाजता सुरू होत असलेले दशक्रिया विधी पुढाऱ्यांच्या भाषणबाजीमुळे कमीत कमी १० वाजेपर्यंत लांबतात. यात गैरहजर असलेल्या लहान-मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे घेऊन, मी त्यांच्या फार जवळचा आहे, असे दाखवत त्यांच्या वतीने शोक व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांची जणू स्पर्धाच लागलेली असते.
काकस्पर्श होईपर्यंत श्रद्धांजलीपर दोन शब्द बोलणे अपेक्षित असताना, काकस्पर्श झाल्यानंतरसुद्धा तासभरापेक्षा जास्त वेळ या मंडळींची भाषणबाजी सुरूच राहते. तसेच दशक्रिया विधीत विविध मंदिरांना, विविध विकासकामांना, वारकरी संस्था, शिक्षण संस्थेला देणगी देण्याची प्रथा आता नव्यानेच सुरू केल्याने त्याला सुध्दा १५ ते २० मिनीटे जातात, दशक्रियेच्या निमित्ताने जमलेल्या आयत्या गर्दीचा भाषणबाजी व प्रसिद्धीसाठी अनेक नेते मंडळींकडून वापर केला जातो. काही वेळा तर , मृत व्यक्तीच्या जीवनमानाबद्दल काहीही माहिती नसतानासुद्धा ही मंडळी मृत व्यक्तीऐवजी दुसऱ्याच गोष्टीचे भाषणे ठोकतात. यातून दशक्रिया विधीघाटाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर होऊ लागल्यासारखे वाटत आहे. या भाषणबाजीमुळे दशक्रिया विधीचा मूळ उद्देशच दुर्लक्षिला जात आहे. त्यातून वेळेचे भान न पाळल्याने विधीचे पावित्र्यसुद्धा हरवले जात आहे. दशक्रिया विधीवेळी कुटुंबाचे सांत्वन कमी प्रमाणात व भाषणबाजी जास्त, अशी स्थिती दिसून येत आहे. ही पडलेली प्रथा कुठेतरी थांबली पाहिजे…. याच हेतूने आळंदीत श्रध्दांजली पर मनोगताला बंदी घालण्यात आली आहेत