दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
मुंबई, १४ ऑक्टोबर २०२४
राज्यात येत्या दोन दिवसांमध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. पंरतु, सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. नुकताच ‘नारायणगडा’वर पार पडलेल्या दसरा मेळाव्यातून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आचारसंहितेच्या घोषणेनंतर निवडणुकीच्या अनुषंगाने भूमिका स्पष्ट करू, असे जाहिर केले आहे. त्यांच्या कुठल्याही भुमिकेला ओबीसी समाज बांधवांचा पाठिंबा राहील, असे सुतोवाच इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.१४) केले.
जरांगे यांनी थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर राज्यातील सर्व ओबीसी बांधव त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतील. निवडणूक न लढवता समाजहिताच्या अनुषंगाने कुठल्या विचारधारेच्या मागे उभे राहायचे, यासंबंधीचे निर्देश दिले तरी ओबीसी त्यांच्या सुचनांचे पालन करतील.वास्तविक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी निवडणूक लढवून समाजाचे प्रतिनिधीत्व कायदेमंडळात पोहचवण्याचा मानस ओबीसी-मराठा समाजाचा असल्याचे पाटील म्हणाले.मराठा-ओबीसी समन्वय समितीच्या वतीने जरांगे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर ओबीसी उमेदवारांना किमान २५ जागा सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने देखील सध्या चाचपणी सुरू असल्याचे पाटील म्हणाले.
इतर मागासवर्गीयांना एकत्रित करून आगामी निवडणुकीत बहुजनांविरोधातील विचारधारेला सत्तेतून खाली खेचता येईल,असे पाटील पुढे बोलतांना म्हणाले. मराठा-ओबीसींची मोट बांधण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठकांना वेग आला आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर, लातूरसह राज्यातील बड्या शहरांमध्ये या बैठका पार पडल्या आहेत. एकीने निवडणुकीला समोर जाण्यासंबंधी या बैठकांमध्ये विचारमंथन सुरू असल्याचे देखील पाटील म्हणाले.जरांगे काय भूमिका घेणार याकडे अवघ्या समाजाचे लक्ष लागले असल्याचे यानिमित्ताने पाटील यांनी स्पष्ट केले.