चेतक हत्तिमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
लाखनी :- येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब मागील 20 वर्षांपासून सातत्याने परिसरातील पर्यावरण नावे धारण करणाऱ्या पर्यावरणसंस्थांना सर्वच सणे पर्यावरणस्नेही कसे साजरे करावे याचा आदर्श वस्तुपाठ स्वकृतीने देत असून भारतात प्रथमच लागोपाठ सहाव्या वर्षी पर्यावरणस्नेही विजयादशमी व पर्यावरण समस्या दर्शविणाऱ्या रावण प्रतिकृतीचे दहन ग्रीन पार्क सावरी येथे करण्यात आले.
अशाप्रकारचा पर्यावरणस्नेही विजयादशमीचा कार्यक्रम केवळ विदर्भ- महाराष्ट्रातच नव्हेतर संपूर्ण भारतदेशात सुद्धा प्रथमच मागील सहा वर्षांपासून आयोजित केला जात आहे.
ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे यशस्वीरीत्या निःशुल्क 6 दिवसाचा पर्यावरण संदेश देणारा ग्रीन गरबा व दांडिया कार्यक्रम महाराष्ट्रात प्रथमच आयोजित केल्यानंतर पर्यावरणस्नेही विजयादशमीचे आयोजन अभिनव व अनोख्या आगळ्यावेगळ्या प्रकारे केले गेले.
पर्यावरण समस्या दर्शविणाऱ्या 18 फूट उंच प्रतिकात्मक रावण प्रतिकृतीची निर्मिती करण्यात आली. रावणाचे दहा डोके म्हणजे जागतिक तापमान वाढ,पक्षी प्राणी शिकार, फटाक्यांचा वापर,जल व वायू प्रदूषण,केरकचरा अस्वछता, प्लास्टिक प्रदूषण,वृक्ष कटाई, व्यसनी अंमली पदार्थ, लोकसंख्या वाढ,रोगराई इत्यादी समस्या दर्शविणारे फलक प्रत्येक डोक्यावर तसेच पर्यावरण नाशक ढाल व तलवार असे फलक दर्शविण्यात आले.
तसेच रावणाच्या शरीरात फटाके न भरता लाखनी नेचर पार्कवर स्वच्छता अभियान राबवून जमा केलेला कचरा भरण्यात आला.त्याचबरोबर रावणाच्या शरीरावर चांगल्या वृत्तीचे वाईट गोष्टीवर विजय म्हणून वाईट पदार्थांचे प्रतीके असलेली रिकामी गुटखा, तंबाखू, सिगारेट यांची पाकिटे तसेच देशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा हार टाकण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सावरी सरपंच सचिन धांडे, ज्येष्ठ नागरिक भैय्याजी बावनकुळे,ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे पर्यावरण ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने, अध्यक्ष अशोक वैद्य, पदाधिकारी अशोक नंदेश्वर,मानव सेवा मंडळाचे शिवलाल निखाडे, दिलीप निर्वाण, सावरी ग्रामपंचायत माजी उपसरपंच वीणा नागलवाडे, जमीन दानशूर महिला गभने यांच्या प्रमुख उपस्थितीत शमी झाडाचे पूजन करण्यात आले.
यानंतर उपस्थित सावरी मुरमाडीवासीय नागरिकांना दसरा दिवाळीसारख्या सणात फटाक्याची आतिषबाजी करून केवळ करमणूक करण्यापेक्षा स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छता ठेवावे व पर्यावरण उद्देश असलेल्या संस्थांनी सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून चुकीचा संदेश देऊ नये असे आवाहन यावेळी उपस्थित शेकडोंच्या संख्येने उपस्थित महिला पुरुषांना करण्यात आले.
यानंतर प्रतिकात्मक रावणदहन कार्यक्रमानंतर ग्रीन पार्क परिसरातील उपस्थित सर्व महिलांना ग्रीन गरबा दांडिया मध्ये सहभाग नोंदविल्याबद्दल परंपरेप्रमाणे सोन्याची पाने न वाटता मोफत सोन्याची झाडे (आपट्याची झाडे) वृक्षारोपण करण्याकरिता वाटण्यात आली.तसेच जिमजवळ वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले यात विशेषतः मेघा खराबे, मिनाक्षी धुर्वे, जयश्री चोले,सुनंदा शेंडे, विणा नागलवाडे, ज्योती डुंभरे,दिपप्रभा फंदे, रंजना लुटे, भुमेश्वरी चौहान, शीतल रेहपाडे, लक्ष्मी बारस्कर,दिव्या धांडे, सुरेखा मने इत्यादीं तसेच शिवशक्ती महिला ग्रुप सावरीच्या सर्व महिला सदस्यांना या सर्व पर्यावरण गरबा राउंड घेणाऱ्या महिलांना तसेच शिवशक्ती महिला ग्रुप सावरीच्या सर्व महिला सदस्यांना सोन्याची झाडे व प्रमाणपत्र प्रमुख अतिथींच्या हस्ते वाटण्यात आले.प्रास्ताविक प्रा. अशोक गायधने तर आभार प्रदर्शन अशोक वैद्य यांनी केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अशोका बिल्डकॉनचे पर्यवेक्षक अभियंता नितीश नागरिकर,निर्वाण हार्डवेअरचे भुपेंद्र निर्वाण, रा. स्व. संघ पर्यावरण विभाग भंडारा गोंदिया जिल्हा शाखा, नेफडो भंडारा जिल्हा शाखा, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा व तालुका शाखा लाखनी, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ मनोज आगलावे, श्री. हॉस्पिटल संचालक डॉ. योगेश गिऱ्हेपुंजे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता रजत अतकरे व ऋतुजा वंजारी,महाराष्ट्र प्लास्टीक सेंटरचे अनिल बावनकुळे,नाना ऑप्टिकल्सचे शरद वाघाये,लाखनी नगरपंचायत तसेच नगरपंचायत सदस्य संदीप भांडारकर, सावरी उपसरपंच मंगेश धांडे, ग्रामपंचायत सदस्य मोहन रेहपाडे,शशिकांत गायधनी, हेमंत वंजारी,ग्रीनफ्रेंड्स पदाधिकारी दिलीप भैसारे, योगेश वंजारी,आशिष खेडकर, सर्पमित्र सलाम बेग,सर्पमित्र वडेकर, ओंकार चाचेरे, मंथन चाचेरे,सामाजिक कार्यकर्ते सुरज कावळे, चेतन चाचेरे,मधुकर गायधनी,युवा कार्यकर्ते आर्यन धांडे,देव वंजारी, कश्यप चाचेरे, नैतिक बोंद्रे, मयूर नान्हे, सौरभ नान्हे, गौरव चाचेरे, नयन देशमुख, गुंजन दिघोरे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.