ऋषी सहारे
संपादक
पोमके बेडगाव पासून ६ कि. मी. अंतरावर असलेल्या मौजा दवंडी येथील किराणा दुकानदार लखन सुन्हेर सोनार याची ११ आक्टोंबरला ५ ते ६ अनोळखी इसमांनी धारधार शस्त्राने हत्या केली होती.
पतीच्या हत्याकांडात पत्नीचा व तिच्या प्रियकराचा हात असल्याचे पोलीसांच्या तपासात उघड झाल्याने परिसरात खडबड उडाली आहे.
काळे कपडे परिधान केलेल्या ५ ते ६ इसमांनी घरात घुसुन पत्नी समोर धारदार शस्त्राने हत्या केल्याची तक्रार पोलीस मदत केंद्र,बेडगाव येथे प्राप्त झाली होती.
प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलीस स्टेशन कोरची येथे अप क्र. ९९/२०२३ कलम ३०२, ३४ भादवी अन्वये दिनांक १२/१०/२०२३ रोजीचे २१:२५ वा.अज्ञात आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस स्टेशन कोरची येथील पोलीस निरिक्षक फडतरे व पोमकें बेडगावचे प्रभारी पोउपनि विठ्ठल सूर्यवंशी यांनी गोपनीय तपास पथक तयार करुन गावातील रहिवासी,नातेवाईक यांचेकडे सखोल चौकशी केली असता,मयताची पत्नी नामे सरिता लखन सोनार रा. दवंडी हीचे दवंडी येथील सुभाष हरिराम नंदेश्वर या इसमासोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन पती नामे लखन यांच्यामध्ये नेहमीच वाद होत असल्याची माहिती मिळाली.
याच माहितीच्या आधारे तपासाची दिशा ठरवत मयताच्या पत्नीकडे अधिक विचारपूस करण्यात आली.सुरुवातीला तिच्याकडुन उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.त्यानंतर तिला विश्वासात घेऊन विचारपुस केली असता,तिने प्रियकर व त्याच्या साथीदाराच्या मदतीने पतीची हत्या केली असल्याचे सांगितले.
मय्यत लखन हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी भांडण करत होता व तिचा शारीरिक मानसिक छळ करीत होता.या त्रासाला कंटाळुन आरोपी मय्यताची पत्नी सरिता हिने तिचा प्रियकर नामे सुभाष नंदेश्वर याला सर्व हकिकत सांगत पतीचा काटा काढावा या करीता तगादा लावला होता.
त्यावर दिनांक ०९/१०/२०२३ रोजी लखन सोनार याच्या हत्येचा कट रचुन हत्येची जबाबदारी बळीराम गावडे रा. कुकडेल यांचेकडे देण्यात आली.नियोजीत दि. ९/१०/२०२३ चे रात्री अंदाजे १०.४५ वा. मारेकरी बळीराम गावडे याने मय्यताची पत्नी सरिता हिच्या मदतीने घरात प्रवेश केला व धारदार शस्त्राने लखन सोनार याची निर्घृण हत्या करुन निघुन गेला.
सदर हत्याकांड घटनेची सर्व माहिती आरोपी पत्नी सरिता हिने दिलेली असुन गुन्ह्यातील सर्व आरोपी नामे १) सरिता लखन सोनार,२) सुभाष हरिराम नंदेश्वर दोघेही रा. दवंडी,३) बळीराम गावडे रा. कुकडेल यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन), कुमार चिंता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहील झरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस मदत केंद्र, बेडगावचे प्रभारी पोउपनि विठ्ठल सूर्यवंशी हे करीत आहेत.