वार्ताविशेष…
प्रा.महेश पानसे..
स्त्री हिच मायेची माया समजू शकते किंबहूना पहाटेच्या काळोखात त्या अबोल गोमातेचा रडवेला हंबरडा ऐकूण, वेदना जाणून स्वताचा जीव धोक्यात घालून गोंडस नवजात वासराला घाण वाहून नेणाऱ्या ८ ते १० फुट खोल बंद गटारातून वाचविणारी ती माय वंदनीय ठरली आहे.
दि.१४ सप्टेंबर पहाटेच्या काळोखात मन सुन्न करणारी व चिंतन करायला लावणारी ही घटना मूल शहरातील मूल- चंद्रपूर महामार्गावरील वार्ड १५ मधील ही घटना महामार्गाचे दोन्ही बाजूला ८ ते १० फुट खोलीचे भुयारी गटार जे शहरातील घाण पाणी सतत वाहून नेत असतात.
या गटारावरील अनेक चेंबर न.प.च्या दुर्लक्षतेने उघडे पडलेले आहेत. या बंद भुयारी गटाराला लागून असलेल्या बांधकाम सुरू असलेल्या भुखंडावर गायीने वासराला जन्म दिला. मात्र जन्मल्यानंतर ते गोंडस वासरू खुल्या चेंबर मधून भुयारी गटारात पडले. घटना पहाटे ४ ते ५ ची. सर्वत्र काळोख. वासराच्या विरहाने त्या मुक्या गायीने चौफेर हंबरडा सुरू केला. कदाचित ती मदतीसाठी लोकांना बोलवीत असावी.
पहाटे या महामार्गावरून मॉर्निंग वॉक करणारे शेकडो जण असतात. त्या अबोल मातेची वेदना कुणालाच समजली नाही. लगतच्या घरी किरायाने राहणाऱ्या श्रीमती महेशकर व त्यांची मुलगी डॉ.पुजा यांनी गोमातेची वेदना हेरली व गटारात शोधाशोध सूरू केली.
दरम्यान ते चिमुकले वासरू गटारात चेंबर पासून कितीतरी मिटर अंतरावर सरकत गेले. सौ.महेशकर जिवाची चिंता न करता हातात टॉर्च घेऊन गटारात उतरल्या व चक्क घाण पाण्यातून त्या वासराला उचलून आणले व डॉ.पुजाच्या मदतीने चेंबर मधून बाहेर काढले.
वासराच्या विरहाने विव्हळणाऱ्या गोमातेचे बाळाला लगेच चाटून स्वच्छ केले.वासरुही पान्हयाला भिडला. मात्र ती गोमाता मोठ्या कॄतज्ञतेने सौ.महेशकर यांना पाहात होती.अतिशय भावनिक क्षण लहान मोठ्यांना अनुभवता आला.
सर्वात नवलाची गोष्ट म्हणजे ते नवजात गोंडस वासरू वारंवार सौ.महेशकर यांच्याच पदरात येऊन घुसत होता. सौ.महेशकर यांनी मायेची ममता मायच (स्त्री) समजू शकते ही नैसर्गिक भावना सिद्ध करून दाखविली आहे.
सौ.महेशकर काकू परिसरात मुक्या जनावरांवर प्रेम करणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात.आजवर त्यांनी अनेक मांजरांना व कुत्र्यांच्या पिलांना खाऊ पिऊ घालून मोठे केले आहे. काही वर्षाआधी त्यांचा एकुलता एक मुलगा अपघाताने हिरावला. पुत्र विरहाची वेदना त्याचेशिवाय अधिक कोण जाणू शकतो.
आज त्यांनी अबोल गोमातेला पुत्र विरहाच्या मोठ्या वेदनेतून सोडविले. ते मुके जनावर कॄतज्ञता बोलून व्यक्त करू शकले नाही मात्र ती अबोल गोमाता व तिचे वासरू ज्या नजरेने महेशकर काकूंना न्याहाळत होते ते बघता स्वर्गसुखाचे समाधान माता असलेल्या काकूंना नक्कीच लाभले असेल.
विशेष म्हणजे ती गाय मोकाट जनावरांच्या टोळक्यातली आहे. जनावरांची भावना,वेदना मात्र अशा अवस्थेत गोमातेला वाऱ्यावर सोडणाऱ्या तिऱ्हाईत मालकाला कळत असेल यात शंकाच आहे.
नगर परिषद प्रशासनाला मोकाट जनावरांच्या बाबतीत तर काही देणे घेणे नाही.अन्यथा कमीत कमी भुयारी गटारा वरील चेंबर खूले राहीले नसते.